Nana patole
Nana patole Sarkarnama
विदर्भ

आमच्याच मित्रपक्षातील लोकांनी घेतली कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी...

Abhijeet Ghormare

भंडारा : महाविकास आघाडी सरकारमधील नेते ‘आमच्यामध्ये सर्व काही छान चाललंय...’, असे वारंवार सांगत असतात. पण अधूनमधून एकमेकांवर कुरघोड्यादेखील करत असतात. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप म्हणजेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वादात कॉंग्रेस शांत आहे. पण कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच सहकारी मित्रपक्षाने घेतल्याचे सांगत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली आहे.

ज्या लोकांनी ही व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. आमच्यावर ईडी लागत आहे. म्हणून कॉंग्रेसला बदनाम करणारी लोक आमच्या मित्रपक्षात आहेत, असे म्हणत महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाला नाना पटोले यांनी तोंड फोडल्याचे मानले जात आहे. विदर्भातील गोंदीया येथे कॉंग्रेसच्या मेळाव्यात नाना बोलत होते. हे सांगताना त्यांनी मित्रपक्ष असा उल्लेख केला, पण राष्ट्रवादी कॉंग्रेस की शिवसेना, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी नेमकी घेतली कुणी, याचा शोध राजकीय धुरीणांनी घेणे सुरू केले आहे.

नाना पटोले आपल्या खमक्या आणि बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कुणाशीही पंगे घ्यायला ते घाबरत नाहीत. भाजपचे खासदार असतानादेखील अगदी पक्ष सुप्रिमो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समोरासमोर विरोध करून त्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हा नाना संपले, अशी चर्चा सुरू झाली होती आणि तसे चित्र दिसतही होते. पण फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेऊन नाना पुन्हा उभे झाले. फक्त उभेच झाले नाही, तर त्यांनी कॉंग्रेसला महाराष्ट्रात नवसंजीवनी दिली. विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी काही चांगले, धाडसी निर्णय घेतले आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना त्यांनी नवी उभारी दिली.

‘सुपारी घेतली’ हे वक्तव्य करून त्यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये नवा वाद सुरू होईल, असे सांगितले जात आहे. याचा फायदा विरोधी पक्ष भाजप उचलण्यास तयार बसली आहे, असेही काही राजकीय जाणकारांचे मत आहे. पण एकदा बोलल्यानंतर मागे हटणाऱ्यांमधून नाना पटोले निश्‍चितच नाहीत. त्यामुळे पुढील काळात कॉग्रेसला बदनाम करण्याची सुपारी नेमकी घेतली कुणी, हेसुद्धा ते स्पष्ट करतीलच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT