Bhandara Niyojan Bhavan. Sarkarnama
विदर्भ

Bhandara : पालकमंत्र्यांची बैठक सुरू असताना ‘ख़ुदा न ख़्वास्ता’ आग लागली तर...

अभिजीत घोरमारे

District Administration : जिल्हाच्या विकासासाठी निधीची गंगा वाहणाऱ्या भंडारा येथील नियोजन भवनातील अग्निशमन यंत्रणा आता कालबाह्य होत चालली आहे. अशात ‘ख़ुदा न ख़्वास्ता’ एखादी मोठी घटना घडल्यास काय होणार, या नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे येतात.

भंडारा जिल्ह्यात अग्नीकांडाच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी शासकीय रुग्णालयात नवजात बालकांच्या केअर युनिटला आग लागली होती. त्यात दहा बालकांचा होरपळल्यामुळं मृत्यू झाला होता. हा वेदनादायी अनुभव पाठिशी असतानाही प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सुस्तावल्याचं दिसत आहे.

नागपूरजवळ असलेल्या बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातील अग्नीतांडवाच्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळालाय. अशात ‘सरकारनामा’ने केलेल्या पाहणीत काही धक्कादायक बाबी पुढं आल्या. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी घडलेल्या प्रचंड धक्कादायक अग्नीकांडानंतरही प्रशासन गंभीर झालेलं दिसत नाही. नियोजन भवनात तर कालबाह्य होत आलेले अग्नीशामक सिलिंडर लागलेले दिसले. त्यांची नियमित तपासणी केलेली नव्हती. कोणत्याही इमारतीमधील सुरक्षेच्या दृष्टीने अग्नीशमन यंत्रणा खुपच महत्त्वाची असते.

अग्नीशमन सिलिंडरसोबतच आपत्कालीन प्रसंगी बाहेर जाण्याचा मार्ग, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगी एकत्र येण्यासाठी ‘असेंम्बली पॉइंट’ आदीचा अभाव दिसून आला. यासंबंधातील कोणतेही दिशादर्शक फलक आढळले नाहीत. आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लाल रंग असलेल्या पाइप्सचाही अभाव दिसला. जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आदींच्या उपस्थितीत नियोजन मंडळाची बैठक नेहमी आयोजित होत असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नियोजन भवनात अशी बैठक सुरू असताना देव न करो एखादी आपत्ती ओढवल्यास प्रशासन ऐनवेळेवर धावाधाव करणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियोजन भवनापेक्षा इतर सरकारी कार्यालयांची परिस्थिती वेगळी नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, रुग्णालयांमध्ये अग्नीशमन यंत्रणा आहे. परंतु सध्या कार्यान्वित असलेली यंत्रणा पुरेशी नाही, असेच चित्र आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही आग विझविण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं नसल्याची माहिती आहे. त्यामुळं सिलिंडर असले तरी आग कशी विझवायची असा प्रश्न अधिकारी, कर्मचाऱ्यांना पडतो.

प्रशासकीय यंत्रणेने या संवेदनशील विषयाकडं गांभीर्यानं लक्ष देणं नितांत गरजेचं झालय. मात्र पूर्वानुभवातून प्रशासन आपल्यात बदल करताना दिसत नाही. परिणामी एखादा प्रसंग ओढवल्यास कुणाला जबाबदार धरावे असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडणार आहे. प्रशासनानं वेळीच सावध होत ‘दुर्घटना से देर भली..’ हे ओळखणं आता गरजेचं आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT