Union Minister Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

पारडी पूल : गडकरींच्या प्रतिमेला गेला तडा, अन् भाजपची झाली पंचाईत...

काम अर्धवट स्थितीत असतानाच पुलाचा ३० मीटरचा एक स्लॉट कोसळला अन् विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. यामुळे गडकरी Union Minister Nitin Gadkari काहीसे अडचणीत आले.

अतुल मेहेरे

नागपूर : पूर्व नागपुरातील पारडी ते एचबी टाऊन दरम्यान उड्डाणपुलाचा एक स्लॉट कोसळला. या घटनेमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिमेला चांगलाच तडा गेला. जीडीसीएल नामक कंपनीला या पुलाचे कंत्राट दिले गेले आहे. भाजपचा एक माजी खासदार आणि फायनान्सर या कंपनीचे संचालक असल्याने भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे.

केवळ नागपूरच नाही तर देशभरात रस्ते आणि पुलांचे जाळे गडकरींनी विणले आहे. कोट्यवधी रुपयांची अवाढव्य कामे अतिशय कमी कालावधीत पूर्ण करण्याची किमया त्यांनी साधली आहे. पण त्यांच्या मतदारसंघातील पारडीच्या पुलाचा आणि त्यांचा काय छत्तीसचा आकडा आहे, हे भल्याभल्यांना कळलेले नाही. या पुलाच्या नंतर सुरू झालेली कामे पूर्ण झाली, लोकार्पण झाले आणि लोकांच्या वापरातही ते रस्ते आणि पूल आहे. पण गेल्या ६ वर्षांपासून या पुलाचे काम मात्र पूर्ण झाले नाही. तसे पाहिले तर काम फार मोठेही नाही. केवळ ५०० मीटर अंतराचा हा उड्डाण पूल आहे. काम अर्धवट स्थितीत असतानाच पुलाचा ३० मीटरचा एक स्लॉट कोसळला अन् विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. यामुळे गडकरी काहीसे अडचणीत आले.

कार्यकर्त्यांची पंचाईत..

ज्या जीडीएसएल कंपनीला या पुलाचे कंत्राट दिले आहे, त्या कंपनीचे संचालक माजी खासदार आणि एक फायनान्सर आहेत. त्यामुळे सांगताही येत नाही अन् काही करताही येत नाही, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची स्थिती झाली आहे. हा पुल पडल्याचा सर्वाधिक फटका गकडरींनंतर कुणाला बसला असेल तर तो पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि या भागाचे भाजपचे नगरसेवक. आता लोकांना उत्तरे देता देता त्यांच्या नाकी नऊ आले आहेत. २०१९ मध्ये या पुलाचे काम पूर्ण करणे गरजेचे होते. कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे स्वतः गडकरीही वैतागले आहे, असे भाजपचे कार्यकर्ते खासगीत सांगतात. पण आता लोकांना सांगताना कार्यकर्त्यांचीही मोठी पंचाईत झाली आहे.

नगरसेवकाने डांबले होते अधिकाऱ्यांना..

पुलाचे काम रेंगाळत ठेवल्याने भाजपच्या एका नगरसेवकाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना डांबून ठेवले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे गडकरी प्रचंड संतापले होते. एका पाठोपाठ घटना घडत असतानाही पारडी उड्डाण पुलाचा कंत्राटदार मात्र फारसे गंभीरपणे लक्ष देत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आता तर पुलाचा एक मोठा भाग कोसळला. त्यामुळे त्यावेळी त्या नगरसेवकाने केलेली कृती योग्य होती, असा सूर परिसरातील नागरिकांत आणि भाजप कार्यकर्त्यांतून उमटत आहे. परवा ईदची सुटी असल्याने पूल कोसळल्यावर प्राणहानी झाली नाही, पण पुलाच्या कामातील भ्रष्टाचार मात्र ऊजागर झाला आहे. या भ्रष्टाचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे नागपुरकरांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT