Nana Patole and Prafull Patel on Bhandara ZP
Nana Patole and Prafull Patel on Bhandara ZP Sarkarnama
विदर्भ

पटेलांनी पुन्हा केली पटोलेंना घेरण्याची तयारी, ‘त्या’ सदस्यांना अटक करणार?

Abhijeet Ghormare

भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दिग्गज नेत्यांमधून विस्तवही जात नाही. दोन्ही जिल्ह्यांत जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उठला. तो धुरळा बसत नाही तोच प्रफुल्ल पटेलांनी (Prafull Patel) पुन्हा नाना पटोलेंना घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

१० मे रोजी जिल्हा परिषद (ZP) अध्यक्षांच्या निवडणुकीत भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेत नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपमध्ये आधीच नाराज असलेले माजी आमदार चरण वाघमारे यांचा ५ सदस्यांचा गट फोडला. ते ५ सदस्य आणि १ अपक्ष यांच्या साथीने आपला अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसवला. पण या निवडणुकीच्या दिवशी मोठा राडा झाला आणि भाजपचे निष्ठावान आणि फुटीर, या दोन गटांच्या सदस्यांमध्ये मोठा राडा झाला. परस्परविरोधी तक्रारी झाल्या, गुन्हे दाखल झाले. वाघमारेंचे जे ५ सदस्य कॉंग्रेसकडे आले, त्यांतील ३ सदस्यांवर या राड्यामध्ये ॲट्रॉसीटीचा गुन्हा दाखल झाले. तेव्हापासून फुटीर आणि अपक्ष असे सहाही सदस्य गायब झाले आहेत. त्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सहलीला पाठविण्याची आल्याची माहिती आहे.

भंडारा जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संदीप ताले, पंचायत सभापती नंदू राहंगडाले आणि उमेश पाटील या तिघांवर ॲट्रॉसीटी ॲक्ट अन्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. आता उद्या विषय समिती सभापतींची निवड आहे आणि यावेळी हे सदस्य हमखास जिल्हा परिषदेमध्ये येतील. कारण निवडणुकीसाठी त्यांना सभागृहात हजर असणे गरजेचे आहे. पण त्यांना जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यापूर्वीच अटक करण्याची व्युव्हरचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादीच्या चक्रव्युव्हात जर कॉंग्रेसचे हे तीन सदस्य फसले, तर उद्याच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडणुकीवर त्याचा मोठा प्रभाव पडेल. कारण या निवडणुकीसाठी कॉंग्रेसला २७ चा जादूई आकडा दाखवावा लागणार आहे. म्हणून या तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा, म्हणून कॉंग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यांचे वकील न्यायालयात फाईल घेऊन तयार आहेत. जर का आज त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला, तर राष्ट्रवादीची व्युव्हरचना फेल ठरणार, हे नक्की आणि जामीन नाही मिळाला, तर पोलिस त्या तिघा सदस्यांना अटक करण्यात कुठलीही कसर ठेवणार नाहीत. कारण गृहमंत्रालय राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे उद्याची सभापतींची निवडणूक ड्रामा हायव्होल्टेज ठरणार, हे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT