Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

नाना उवाच ! पटोले म्हणतात मोदीला अटक केली, तर पोलिसांचा इन्कार...

Abhijeet Ghormare

भंडारा : आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडिओने भंडारा (Bhandara) जिल्ह्यासह देशभर राजकीय वादळ निर्माण केले. भंडाऱ्यातून आज परतल्यानंतर नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पत्रकारांशी बोलताना नाना (Nana Patole) म्हणाले की, पोलिसांनी मोदी नामक त्या गुंडाला अटक केली आणि बयाण घेण्याचे काम सुरू आहे. पण पोलिसांनी मात्र या बाबीचा इन्कार केला आहे. आता जाणून घेऊ या गेल्या तीन दिवसांत काय घडले, याचा ग्राऊंड रिपोर्ट.

16 जानेवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जेवनाळा येथे प्रचार सभा होती. त्यादरम्यान आपण मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो, असा वक्तव्य नाना पटोले यांनी केले. १७ जानेवारीला हा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर टीकेची एकच झोड उठली. शेवटी नाना पटोले यांनी घूमजाव करीत खुलासा केला होता. दरम्यान त्यांनी आपण हे संपूर्ण वाक्य मोदी नामक गावगुंडाच्या बाबतीत बोललो होतो. भाजपच्या लोकांनी त्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला. लोकांनी माझ्याकडे त्या गावगुंडाची तक्रार केली असल्याने त्यासंदर्भात त्यांना धीर देण्यासाठी मी हे वाक्य बोललो असल्याचेही नाना म्हणाले. भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदी नामक गुंडाला अटक केली असून याबाबत बयाण घेणे सुरू असल्याचे नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना म्हणाले. भाजप मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी विषयाचा, वाक्याचा आणि अर्थाचा, अनर्थ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मात्र त्यांच्या हा दावा फोल ठरत आहे. मोदी नावाच्या अशा कुठल्याच स्थानिक गुंडाला अटक केली नसल्याचा दावा भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण वायकर यांनी म्हटले आहे. ज्या तक्रारी आल्या आहे, त्याबाबत चौकशी करत असून चौकशीला सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चौकशीत जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही वायकर यांनी स्पष्ट केले आहे. ज्या गावात नानांनी ते वादग्रस्त वक्तव्य केले, त्या गावातून हा व्हिडिओ बाहेर आला आहे. त्या गावातील सत्य मात्र वेगळेच काही दिसत आहे.

आपल्या गावात मोदी नामक कोणताही गावगुंड नसल्याचा खुलासा गावकऱ्यांनी केला आहे. या गुंडाचे आजपर्यंत नावही न ऐकल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. एकंदरीत भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडिओने उठलेले वादंग देशभर पेटले असून देशभरातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून नानांच्या अटकेची मागणी केली जात आहे. त्यामुळे सध्या तरी या जाचातून नानांची सुटका होईल, असे वाटत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT