Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
विदर्भ

पवनीच्या वाळू माफियांचे महसूलमंत्र्यांना आव्हान? आता तरी मोक्का लागेल का?

Abhijeet Ghormare

भंडारा : भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करीचे ‘हब’ असलेल्या पवनी येथील वाळू माफियांनी आज कारवाईसाठी गेलेल्या एसडीओंवर हल्ला करून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाच आव्हान दिले आहे. आता एखाद्या अधिकाऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येईल का, असा सवाल विचारला जात आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात वाळू तस्करी होत नाही, असे उत्तर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भंडारा-गोंदियाचे आमदार डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला दिले होते. आजच्या घटनेने महसूलमंत्र्यांचे उत्तर किती फोल होते, याची प्रचिती आली आहे. वाळू माफियांच्या (Sand Mafiya) मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्यावर मोक्का लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पण संबंधितांकडून अद्यापतरी तशी पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

भंडारा जिल्ह्यात प्रफुल्ल पटेलांसारखे ताकदवर तर नाना पटोलेंसारखे लोकनेते आहेत. अशा मोठमोठ्या नेत्यांच्या जिल्ह्यात अधिकारी सुरक्षित नसतील तर इतरांचे काय, असाही प्रश्‍न आजच्या घटनेने उपस्थित केला आहे. कमी वेळात झटपट श्रीमंत होण्याच्या एकमेव मार्ग म्हणजे वाळू तस्करी. त्यामुळेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या व्यवसायात येऊ लागले आहेत. अशा लोकांमुळे वाळू तस्करीत संघटित गुन्हेगारी वाढू लागली आहे. याच प्रकारातून वाळू तस्करांवर कारवाई करण्याकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांवर संघटित होऊन प्राणघातक हल्ले होऊ लागले आहेत. त्यामुळे आता वाळू तस्करांचा फणा ठेचण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ‘मोक्का’ लावल्याची गरज निर्माण झाली आहे. कमीत कमी उपविभागीय अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ल्यानंतर तरी याची गरज आहे.

पवनीला वलनी, मांगली, इटगाव, कुर्जा, खातखेडा, गुडेगांव, भोजपुर, धानोरी, वाघधरा, जूनोना आदी वाळू घाट आहेत. सध्या पवनी तालुक्यात एकाही वाळू घाटावरून वाळू काढण्यास शासनाची परवानगी नाही. मात्र या घाटातून रोज वाळू तस्करी होत असते. यात काही वाळू तस्करांनी विविध राजकीय पक्षांचा झेंडा हातात घेतल्याने वाळू तस्करांचे मनोबल उंचावले आहे. कमी वेळात अधिक पैसा मिळत असल्याने तस्कर वाळू तस्करी येनकेन प्रकारे करीत असतात आणि त्यांना रोखायला गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करायलाही तस्कर मागेपुढे बघत नाहीत. त्यामुळे मोक्का सारखा कायदा वापरून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मागणी जोर धरत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT