Pombhurna Ambedkari Community Sarkarnama
विदर्भ

Pombhurna Ambedkari Community : 'ते' बॅनर काढल्यावरून संतापला आंबेडकरी समाज, रात्री १२ वाजेपर्यंत रोखून धरली वाहतूक !

Dr. Ambedkar Square : आंबेडकर चौकात लावण्यात आलेला शुभेच्छा संदेश नगरपंचायत प्रशासनाने काढला.

संदीप रायपूरे

Chandrapur District Ambedkari Community News : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो बांधवांसह नागपुरात धम्मदीक्षा घेतली. यानंतर त्यांनी चंद्रपुरातही दीक्षेचा कार्यक्रम घेतला. तेव्हापासून पंधरा व सोळा ऑक्टोबरला जिल्ह्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते. अनेक नेते, कार्यकर्ते फलक लाऊन नागरिकांना शुभेच्छा देतात. (The Nagar Panchayat administration removed the greeting message put up at Ambedkar Chowk)

चंद्रपूर जिल्ह्यातील पोभुर्ण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात लावण्यात आलेला शुभेच्छा संदेश नगरपंचायत प्रशासनाने काढला. एवढेच नव्हे तर ते बॅनर कचरागाडीत टाकले. आंबेडकरी नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांच्यात प्रचंड संताप निर्माण झाला. या प्रकरणी दोषींवर कार्यवाही करण्यासाठी समाज रस्त्यावर उतरला. रात्री १२ वाजेपर्यंत चक्काजाम करून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

नेमकं काय घडलं?

पोंभुर्णा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. काल (ता. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास नगरपंचायत प्रशासनाने बॅनर काढले व ते नगरपंचायतीत जमा करण्यासाठी कचरागाडीत टाकले. बॅनर कचरागाडीत टाकल्यामुळे आंबेडकरी समुदायासह बहुजन समाजातील शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. आंबेडकर चौकातून त्यांनी नारेबाजी करीत तीव्र संताप व्यक्त केला. या वेळी तब्बल चार तास रस्ता रोखण्यात आला.

चोख पोलिस बंदोबस्त...

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर हा प्रकार घडल्याने पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले. उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्यासह जिल्ह्याच्या विविध पोलिस ठाण्यांचे ठाणेदार पोंभुर्ण्यात दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी दंगा नियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले. सामाजिक विषयांत पोंभुर्णा हा संवेदनशील मानला जातो. काही वर्षांपूर्वी गावात संचारबंदी लागली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

असा निघाला तोडगा...

बाबासाहेबांचे बॅनर काढून कचरागाडीत टाकल्यावरून पोंभुर्ण्यात रात्री सातपासूनच शेकडो नागरिक एकत्र आले. या प्रकरणी दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी करीत त्यांनी रस्ता रोखून धरला. चौकात आंबेडकरी अनुयायांसोबत विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. आंबेडकरी समाजाचा रोष बघता प्रशासनही अलर्ट झाले. अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

जोपर्यंत बॅनर होते, त्या ठिकाणी सन्मानाने लावले जाणार नाही आणि नगराध्यक्ष व मुख्याधिकारी जाहीर माफी मागणार नाही, तोपर्यंत हटणार नसल्याच्या भूमिकेवर अनुयायी ठाम होते. रात्री सात वाजता सुरू झालेले आंदोलन १२ वाजेपर्यंत सुरू होते. शेवटी पोभुर्णा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आशिष घोडे व नगराध्यक्षा सुलभा पिपरे यांनी घटनास्थळी जाहीर माफी मागितली.

या वेळी कचरागाडीत टाकलेला बॅनर होता त्याच ठिकाणी सन्मानाने लावण्यात आला. यानंतर चार तास चाललेले आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान, पोंभुर्ण्याच्या नगराध्यक्ष सुलभा पिपरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी झालेला प्रकार हा खेदजनक असल्याचे सांगितले. कुणाच्याही भावना दुखावण्याचा नगरपंचायत प्रशासनाचा हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT