Prakash Ambedkar News : 14 फेब्रुवारी ला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. 'व्हॅलेंटाइन डे' म्हटलं म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. याच अनुषंगाने राजकीय पक्षांनीही प्रेमाच्या दिवसाचे औचित्य साधत मतदारांवर राजकीय प्रेमाचा 'डाव' साधण्याचा प्रयत्न केला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात वंचितकडून शहरात प्रेमाच्या रंगाची पोस्टरबाजी करीत मतांची पेरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
अकोल्यात सध्या या 'लाल' रंगाच्या पोस्टरची चर्चा असून 'ये दिल मांगे' म्हणत वंचितची राजकीय पोस्टरबाजी 'व्हॅलेंटाईन डे' ला विशेष चर्चेचा विषय बनली आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातही इच्छुकांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे कायम चर्चेत राहणारा मतदारसंघ.
अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग अकराव्यांदा आंबेडकर हे निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांनी आधीच केली असल्याने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते 'साहेबांना' लोकसभेत पाठवण्यासाठी तयारीला लागले आहेत. जिल्ह्यात 'वंचित'कडून धार्मिक, सामाजिक आदी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर ॲड. प्रकाश आंबेडकर व प्रा.अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर यांचे जिल्ह्यात सातत्याने दौरे वाढले असून विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत मतपेरणी केली जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'व्हॅलेंटाईन डे' हा दिवस म्हणजे आपल्या भावना जोडीदारासमोर व्यक्त करण्याचा दिवस. प्रेम म्हटलं की 'लाल' रंगाचा उल्लेख होतो. प्रेमी युगुलांसाठी लाल रंग विशेष मानला जातो. प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना प्रेमाची भेटवस्तू देताना प्रामुख्याने याच 'लाल' रंगाची निवड करतात. मग लाल रंगाचा गुलाब असो किंवा इतर कोणत्याही लाल रंगाच्या वस्तूची निवड केली जाते. प्रेम आणि लाल रंगाचा संबंध फार पूर्वीपासून आहे. प्रेम आणि लाल रंगाचं नातं हे इतिहास काळापासून घट्ट असल्याचे बोलले जाते.
यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे आज व्हॅलेंटाइन डे' सर्वत्र साजरा केला जात आहे. 'वंचित' ने हेच टायमिंग साधत प्रेमाच्या रंगातून मतांची पेरणी केली आहे. लाल रंगातील 'वंचितची पोस्टरबाजी सध्या अकोल्यात चर्चेचा विषय बनली आहे. ऐन 'व्हॅलेंटाईन डे' संपूर्ण शहरात वंचितकडून करण्यात आलेली पोस्टरबाजी लक्ष वेधून घेत आहे. प्रेमाच्या रंगातून वंचितने राजकीय प्रेमाचा 'डाव' साधला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. नवीन वर्ष लागल्यानंतर 'नया साल नया खासदार' म्हणत केलेली 'वंचित'ची पोस्टरबाजी चर्चेत आली होती.
अगदी फिल्मी स्टाईलने पुन्हा पोस्टरबाजी करण्यात आली. 'हिम्मतवाला' म्हणत 'निडर' - 'बेखौफ' 'बेबाक'पणे पोस्टरबाजी करण्यात आली. याची चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा 'वंचित'चे लाल पोस्टर चर्चेत आले आहेत. पोस्टरवर ॲड. प्रकाश आंबेडकर दिसत असून ये दिल मांगे... बालासाहब आंबेडकर असा मजकूरही आहे. या लाल रंगातून 'व्हॅलेन्टाईन डे'ला मतदारांना अनोख्या पद्धतीनं आकर्षित करण्याचा प्रयत्न वंचितने केला आहे. 'वंचित'ची 'व्हॅलेंटाईन डे'ची पोस्टरबाजी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांवर राजकीय प्रेमाचा कसा 'डाव' साधते हे पाहावे लागणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.