Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News : महाविकास आघाडीच्या पत्राबाबत माहिती नाही, मात्र 'इगो' बाजूला ठेवू !

जयेश विनायकराव गावंडे

वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीत समावेशावरून आघाडीतील तिन्ही घटकपक्षाकडून एकमत झाले. तसे पत्रही महाविकास आघाडीकडून वंचितला पाठवण्यात आले आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर म्हणाले, आम्हाला त्या पत्राबाबत माहिती नाही. माहिती घेतल्यानंतर निर्णय घेऊ.

पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमचं टार्गेट भाजपला सत्तेतून बाहेर ठेवणे आहे. त्यासाठी 'इगो' बाजूला ठेवू. प्रकाश आंबेडकर हे आज (ता. 30) वाशीममध्ये माध्यमांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार का, यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावण्यात येत होते. वंचितच्या समावेशाची तारीख आणि मुहूर्त मात्र सापडत नव्हता. वंचितला सोबत घेण्याची भाषा करण्यात येत होती. पण प्रत्यक्षात मात्र प्रवेश काही दिला जात नव्हता.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी वंचितची युती होऊन बरेच महिने लोटले आहेत. पण गेल्या वर्षभरापासून वंचितचा महाविकास आघाडीतील प्रवेशाला काही केल्या मुहूर्त लागत नसल्याने मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच्या सर्व 48 लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा पण इशारा दिला होता. महाविकास आघाडीने जागावाटपाबाबत बैठकीचे आयोजन आज केले होते. दरम्यान, बैठकीचे निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनाही देण्यात आले.

त्यांनी निमंत्रण स्वीकारून वंचितकडून प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांना बैठकीला पाठवले. बैठक पार पडल्यानंतर अखेर महाविकास आघाडीकडून वंचितला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या पक्षांकडून पत्र पाठवण्यात आले. या पत्रात वंचितला महाविकास आघाडीत घेण्यावरून तीनही पक्षांचे एकमत झाले आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेण्याचा चेंडू हा प्रकाश आंबेडकर यांच्या कोर्टात होता.

यावर बोलताना आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर यांना पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी धैर्यवर्धन पुंडकर यांना महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान बाहेर बसवल्याच्या मुद्यावरून विचारले असता, आंबेडकर म्हणाले, पुंडकर हे आमचे प्रतिनिधी असून त्यांच्यासोबत काय घडलं, हे अद्यापही आपल्याला माहिती नाही. महाविकास आघाडीमध्ये समावेशाबाबत जारी करण्यात आलेले ते पत्र मी अद्यापही बघितले नाही.

आमच्याकडे आल्यानंतर ते बघून बोलू, असेही आंबेडकर म्हणाले. दरम्यान, बोलताना आंबेडकर म्हणाले की, आमचं टार्गेट हे भाजपला सत्तेमधून बाहेर करणे हे आहे. त्याच्यामुळे 'इगो' आम्ही बाजूला ठेवलेला आहे. तेवढं आम्ही सांगू शकतो, असंही आंबेडकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आघाडीत जाण्याबाबत वंचित सकारात्मक?

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या पत्रानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवरून वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण बोलताना आंबेडकर म्हणाले, भाजपला सत्तेतून बाहेर करणे हे आमचं टार्गेट आहे. त्यामुळे इगोही बाजूला ठेवायला तयार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र माहिती घेऊन आपण यावर बोलणार असल्याचं ते म्हणाले, तर दुसरीकडे वंचित महाविकास आघाडीत आल्यानंतर आता जागावाटपाचा फाॅर्म्युला लवकरच निश्चित होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आंबेडकर यांच्या यानंतरच्या प्रतिक्रियेवर सर्वांचे लक्ष लागून आहे.

महाविकास आघाडीच्या पत्रात काय?

महाविकास आघाडीने पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, आज रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सूचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे, असं म्हटलं आहे.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT