Prakash Ambedkar at Public Meeting in Nagpur. Sarkarnama
विदर्भ

Nagpur : लाेकसभेच्या जागावाटपावर रडत बसाल, तर 2024 नंतर तिहार जेलमध्ये दिसाल

Prakash Ambedkar : स्त्रीमुक्ती परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला घातली साद

प्रसन्न जकाते

Kasturchand Park : देशात मोदी नावाचे भूत मानगुटीवर बसले आहे. अशात लोकसभा जागा वाटपावरून काही पक्ष अडून बसले आहेत. त्यामुळे आधी यासर्वांनी ठरवावे की, मोदींना हटवायचे आहे की पक्ष वाढवायचा आहे. जागा वाटपाबाबत रडत बसाल तर 2024 नंतर नक्कीच तिहार जेलमध्ये दिसाल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील समविचारी पक्षांना दिला.

नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर मनुस्मृती दहन दिनानिमित्त आयोजित स्त्रीमुक्ती परिषदेत ते बोलत होते. यावेळी आंबेडकर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आवाहन करीत म्हणाले की, ईडी वैगरेच्या दबावतंत्राला बळी पडत मनुवाद्यांच्या सोबत जाऊ नका. आम्ही या मनुवाद्यांना कायमचे गाडण्यासाठी साद घालत आहोत, त्यामुळे आमच्यासोबत या. एकटे मार्गक्रमण करू नका.

देशात पूर्वी मंदिरांमधून सत्ता चालविली जात होती. आता सत्तेचे केंद्र बदलले आहे. देशातील सत्तेचे केंद्र हे संसद आहे. ज्याचा संसदेवर ताबा, तोच देशात सत्ता चालवू शकतो. त्यामुळे मनुवादाची सत्ता उलथवायची असेल, तर संसदेवर ताबा मिळविण्याशिवाय पर्याय नाही, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. देशात दबावाचे आणि ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार संघ आणि भाजपच्या विचारांविरोधात लढा देत आहेत. आम्हीही हा लढा देत आहोत. त्यामुळे वेगवेगळे लढण्यापेक्षा एकत्र येऊन मनुवादी विचारांना कायमचे गाडून टाकू, असे आवाहन अॅड. आंबेडकर यांनी केले.

नरेंद्र मोदी यांच्या 56 इंचाच्या छातीत केवळ गाठ्या आणि फाफडा आहे. त्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. वेगवेगळे लढाल तर मोदी संपवून टाकतील. एकत्र लढाल तर या 56 इंचाच्या छातीला मातीत मिसळविता येईल, ही बाब ‘इंडिया’ आघाडीने समजून घेतली पाहिजे. मोदी आणि संघाने अनेक चुका केल्या आहेत. त्यांनी तुमच्यावर बोट ठेवले तर तुम्ही त्याला प्रत्युत्तर द्या, असे आवाहनही त्यांनी समविचारी पक्षांना केले. ‘इंडिया’ आणि महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीसोबत आली तर स्वागतच आहे. परंतु सोबत आले नाही तर स्वबळावर मनुवादाविरोधात लढण्याची तयारी ठेवा, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनुस्मृती नाकारा, संविधान स्वीकारा

स्त्रीमुक्ती परिषदेत बोलताना अंजली आंबेडकर म्हणाल्या की, मनुस्मृती नाकारत संविधान स्वीकारण्याची वेळ आली आहे. आता कायद्याचे, संविधानाचे युग असले, तरी अनेकांकडून मनुवाद समाजातून जाऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केवळ मनुस्मृती दहन करून काही होणार नाही. लोकांच्या मनातून हे विचार जाईपर्यंत सातत्याने लढा कायम ठेवावा लागणार आहे.

‘आरएसएस’च्या जन्मभूमीतून लढा

नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी आहे. त्यामुळे याच गावातून मनुवादाच्या विरोधातील लढा तीव्र करावा लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर हे यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना संपूर्ण समाजाने साथ देणे गरजेचे आहे, असे विचार वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT