Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar : अधिकृत बायको होता येत असताना ठेवलेली बायको कशाला होऊ!

जयेश विनायकराव गावंडे

Prakash Ambedkar : ‘मला अधिकृत बायको होता येत असेल तर मी ठेवलेली बायको कशाला होऊ’, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत भाष्य केले आहे. ‘मला ज्याच्याशी युती करायची आहे ते उघडपणे करेल’, असेही आंबेडकर म्हणाले. ‘वंचित’च्या 46 उमेदवारांची नावे तयार आहेत. घराणेशाही पोसण्यासाठी आपण पक्ष उभा तयार केलेला नाही. आपण भाजपसोबत जायलाही तयार आहे. मात्र, पुजारी हा विद्यापीठातून येईल, असा कायदा त्यांनी करावा, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. शुक्रवारी (ता. एक) आंबेडकर नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतसे राजकारणही तापत आहे. ‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश झाला असला तरी अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशात नागपुरात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. आंबेडकर म्हणाले, मागील 10 वर्षांत वाइट परिस्थिती झाली आहे. देशावर 2014 मध्ये 24 टक्के कर्ज होते, पण मागील 10 वर्षांत 87 टक्के झाले आहे. भाजपने मोठ्या प्रमाणात कर्ज काढत बेरोजगारी वाढविली. सिंचन क्षेत्र आहे तिथेच आहे. औद्योगीकरण वाढले नाही. गरिबीची संख्या कमी झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे कर्ज काढलेला पैसा गेला कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट’ दाखविण्यात आलेत. यात नागपूर मेट्रो उपयोगी नाही. मेट्रो नफ्यात येणार नाही. आता ही मेट्रो महानगरपालिकेला देण्यात येणार आहे. तोट्यातील मेट्रो मनपावर लादण्यात येणार आहे. जागतिक बँकेने दिलेल्या इशाऱ्यावर मोदी सरकारने खुलासा करण्याची मागणीही आंबेडकर यांनी केली. नागपूरमधील मिहान प्रकल्प अपयशी ठरणार असल्याचा अहवालदेखील कर्ज घेतले आणि ते पैसे वाया घातले. आर्थिकदृष्ट्या भारत उत्तम स्थितीत असताना 10 वर्षांत कमकुवत झाल्याचा असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आघाडीत आम्ही उपरे

वंचित बहुजन आघाडीवाले आम्ही महाविकास आघाडीत उपरे आहोत. किती जागा सुटतील हे माध्यमातून कळते. महाविकास आघाडीतील तीन पक्षात अगोदर चर्चा होते. त्यानंतर आम्हाला सांगितले जाते, असा टोलाही आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला लगावला. काँग्रेस आणि शिवसेनेचे भांडण संपले की आमचेही संपेल. मात्र, युती न झाल्यास आम्ही जागेवर लक्ष ठेऊन आहोत. आम्ही स्वतंत्र लढलो तर कमीत कमी सहा जागा जिंकू, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

राज्यात 42 सभा

आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीत गेलो नाही तर वंचित बहुजन आघाडी 48 जागा लढण्याच्या तयारीत आहे. आपण 10 मार्चपर्यंत 42 जागांवर सभा घेणार आहोत. कार्यकर्त्यांना भोजन देत नसताना, वाहन व्यवस्था देत नसताना लोक आपल्याबरोबर किती आले हे दाखवून दिले आहे. अर्ध्या तुटलेल्या पक्षाने स्वतःची ताकद पाहून जागा मागावी, असे म्हणत त्यांनी फुटलेल्या पक्षांवर निशाणा साधला.

अकोल्यातून लढण्यावर ठाम

भाजपने पक्ष फोडणे आणि लोक विकत घेण्याचा सपाटा सध्या लावला आहे. त्यामुळे त्यांनी 400 जागा निवडून येण्याचा दावा केला जात आहे. तुम्ही नेते विकत घ्याल, पण मतदार विकत घेणार नाहीत. मतदार जे ठरवेल ते करतील. आपण अकोल्यातून लढणार असल्याचे आंबेडकर यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे जाहीर केले. शरद पवार यांनी ठरविलेल्या कार्यक्रमावर आंबेडकर म्हणाले. कुठल्याही पक्षाला कुठेही कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे. कोणालाही भोजनासाठी बोलविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यात राजकीय अर्थ लावणे चुकीचे आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT