नागपूर : लाखो लोकांना रोजगार देणारे वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये जाण्याच्या निषेधार्थ काँग्रेस (Congress) विचार जनजागृती अभियानाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. तेव्हा माननीय राज्यपालांनी सांगितले होते की, जर मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणला असता तर प्रकल्प थांबवता आला असता. मात्र राज्यातील कमकुवत सरकारमुळे एकामागून एक प्रकल्प गुजरातकडे जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुजरात बढाओ देश डुबाओ, या धोरणावर काम करत आहेत. आशियातील सर्वात मोठे पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुटीबोरीच्या एमआयडीसी आणि मिहानमध्ये कोणतेही नवीन उद्योग येत नाहीत. मिहानमध्ये यापूर्वी इन्फोसिसने स्वारस्य दाखवले होते, पण सरकार बदलताच तेही गुजरातचे चाहते झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टाटा समूहाच्या गुजरातला जाणाऱ्या एअरबस प्रकल्पावर मौन पाळले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आपल्या अपयशाचे खापर महाविकास आघाडीवर फोडत आहेत.
गडकरींनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना पत्र लिहिले. २२ हजार कोटींची योजना नागपुरात राबविण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिनाभरापूर्वी केली होती. तरीही प्रकल्प गुजरातला जात असून, राज्यकर्ते व भाजपचे सर्व नेते त्यांच्या वक्तव्यावरून गोंधळलेले आणि मोदींसमोर हतबल व असहाय्य असल्याचे दिसते, असा आरोप माजी नगरसेवक तनवीर अहमद यांनी केला आहे. युवकांकडून रोजगार हिसकावून घेणाऱ्या राज्य सरकारला काँग्रेस विचार जनजागृती अभियान नागपूरच्या वतीने ‘राज्यातील जनतेकडून रोजगार हिसकावणे बंद करा अन्यथा खुर्ची रिकामी करा’ अशा घोषणा देत शहरातील व्हेरायटी चौकात गांधीजींच्या पुतळ्याजवळ निषेध करण्यात आला.
या आंदोलनात माजी उपमहापौर कृष्णशंकर परतेकी, माजी नगरसेवक तनवीर अहमद, ॲड. शिरीष तिवारी, आनंदसिंग ठाकूर, मनोज काळे, राजू जीवने, बाबा कुऱ्हाडे, शरद बाहेकर, सुनील अग्रवाल, ममता तोमर, प्रकाश शेगावकर, रामप्रसाद गहरे, किसन निखारे, सुनील ढोले, सोहन पटेल, भीमराव हाडके, सुखराज पाल, बशीर खान, राजू मिश्रा , रामभाऊ कवडकर, विजय कुर्यवंशी, शेख रशीद, दामू चिरकुटे, राजेंद्र जगाडे, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.