Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University Sarkarnama
विदर्भ

Agricultural University News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठावर खासगी कंपन्यांचा ताबा? वंचितची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

Vidarbha Politics : सरकारी पैशातून खासगी कंपनीचा प्रचार होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

जयेश गावंडे

Akola Politics : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीमध्ये खासगी बियाणे कंपन्यांचे प्रात्यक्षिक दाखवून शासकीय निधी हा खासगी कंपनीच्या प्रचारासाठी वापरला गेला असून, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे मीडिया पॅनललिस्ट राजेंद्र पातोडे यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या ई-मेलद्वारे करण्यात आलेल्या तक्रारीत केली आहे. विशेष म्हणजे याबाबत 'सरकारनामा'ने बातमी प्रकाशित केली होती.

पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद त्याचबरोबर राज्य शासनाच्या कृषी विभागाची मान्यता न घेता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकरीहिताच्या गोंडस नावाखाली शिवारफेरीमध्ये येणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसमोर १३ खासगी बियाणे कंपन्यांच्या पिकाचे विद्यापीठाच्या शेतीत प्रात्यक्षिक दाखविण्याचा अचंबित करून टाकणारा प्रकार केला असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

सरकारी पैशातून खासगी कंपन्यांचा प्रचार का ?

सरकारी पैशातून खासगी कंपनीचा प्रचार होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. शिवारफेरीत येणाऱ्या शेतकऱ्यांना विद्यापीठ इतर कृषी विद्यापीठ त्याचबरोबर इतर सरकारी संशोधन संस्था (भारतीय विचारणा अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन परिषद) यांचे नवे वाण हे दाखविण्यासारखे नाहीत काय, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. तेरा खासगी कंपन्यांचे पिकाच्या उत्पादनासाठी प्रचार प्रसारासाठी विद्यापीठाची शेती उपलब्ध करून दिली. (Akola News)

याविषयी मान्यता राजभवन, कृषी परिषद व राज्य शासनाकडून का घेतली नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे. अशा प्रकारे खासगी बियाणे कंपन्यांची सोय इतरही कृषी विद्यापीठ उपलब्ध करून देणार असेल, तर कृषी विद्यापीठ खासगी कंपनीच्या घशात घालणार आहे का, हा प्रश्न आता विचारला जात आहे.

इतक्यावर विद्यापीठ थांबले नाही तर खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची पेरणी केली, त्यांची शेती कसून दिली. त्यांच्या पिकांचे राखण केले. त्यांच्या पिकांना खतपुरवठा दिला, त्याची पाहणी केली या सर्व कामासाठी विद्यापीठाचे संशोधक, मजूर यांना कामाला जुंपले. हा सर्व प्रकार गंभीर असल्याचा आरोप करीत त्याची चौकशी करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.

पहिल्याच दिवसापासून शिवारफेरी चर्चेत

पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शिवारफेरीचे उद्घाटन केल्यानंतर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा शेतकऱ्यांनी आराेप केला होता. यासंदर्भात 'सरकारनामा'ची बातमी येताच दुसऱ्या दिवशी मात्र शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. मात्र, शिवारफेरीत खासगी कंपन्यांच्या पिकांचे प्रात्यक्षिक दाखवल्याने अनेकांच्या भुवया उंचविल्या. कृषी विद्यापीठातील संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचविण्याचे काम हे विद्यापीठाचे असते. मात्र, यावर्षी खासगी कंपन्यांना का पुढे करण्यात आले, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. दरम्यान, आता यामध्ये काय चौकशी होते हे पाहावे लागणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT