Protest against MLA Raju Karemore Sarkarnama
विदर्भ

Protest Against MLA : राष्ट्रवादीचे आमदार असभ्य वागले, तुमसरमध्ये आरोग्य कर्मचारी तापले

अभिजीत घोरमारे

Bhandara Health Department : महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांच्यावर झालाय. लोकप्रतिनिधीच्या या वागणुकीमुळं धक्का बसलेल्या आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत आमदार कारेमोरे यांचा निषेध केला. या वेळी तुमसरमधील महिला आरोग्य कर्मचारी चांगल्याच संतापल्या होत्या.

तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची कारकीर्द नेहमी चर्चेत राहिली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला तुमसर पोलिस ठाण्यात जाऊन केलेली शिवीगाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्च शब्दांत केलेली दमदाटी आदी प्रकारांमुळे आमदार महोदय सातत्यानं चर्चेत असतात. आता आमदार कारेमोरे यांनी आणखी एका कारणामुळं वाद ओढावून घेतलाय. (Protest against NCP MLA Raju Karemore of Tumsar Constituency in Bhandara District)

आमदार राजू कारेमोरे हे जिल्हा चिकित्सक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक घेण्यासाठी २८ ऑक्टोबरला आले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी व महिला परिचारिकेला त्यांनी जाब विचारताना शिव्यांचा भडीमार केल्याचा आरोप आहे. कक्षसेवक भरत मानकर यांना दोनदा मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. ही घटना घडत असताना जिल्हा शल्यचिकित्सक निमूटपणे बघत होते. आमदारांच्या या त्यांच्या कृतीमुळे महिला परिचारिकाही अवाक झाल्या. ३० ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे या घटनेची तक्रार दाखल केली. परंतु कारवाई झाली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संतापलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यामुळं आमदार कारेमोरे यांच्या विरोधात तुमसर उपजिल्हा रुग्णालयापुढं आंदोलन केलं. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद केलं. आमदार राजू कारेमोरे यांचा निषेध व्यक्त केला. जोपर्यंत आमदार माफी मागणार नाही, तोपर्यंत निषेध करत राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं.

या संदर्भातील आमदार राजू कारेमोरे म्हणाले की, तुमसर उपजिल्हा रुग्णालयात ‘रेफर टू भंडारा’ अशा चिठ्ठ्या दिल्या जातात. रुग्णांना सेवा दिली जात नाही. खासगी रुग्णालयाचे पत्ते देऊन रुग्णांची आर्थिक लूट होतेय. या संदर्भात विचारणा केली आहे. कुठलेही अपशब्द वापरलेले नाहीत. आमदारांनी आपली बाजू स्पष्ट केली असली तरी महिला परिचारिकांचा संताप पाहता हे आंदोलन लवकर शांत होईल अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळं आता आमदार महोदय काय करतात, याकडं सर्वांचं लक्ष आहे.

(Edited By : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT