Vidarbaha State. Sarkarnama
विदर्भ

Nagpur : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पुन्हा जोर, बुधवारपासून नागपूर, बुलढाण्यात...

प्रसन्न जकाते

Demand For New State : स्वतंत्र्य विदर्भाच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सर्वकाही असतानाही शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, माआवोद, कुपोषण आणि नापिकी यामुळे विदर्भाची वाताहात होत आहे. अशात स्वतंत्र राज्य निर्मितीशिवाय विदर्भाचे मागासलेपण दूर होऊ शकत नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी बुधवारपासून (ता. 27) नागपूर आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी ही माहिती दिली. मुबलक नैसर्गिक संसाधन, विक्रमी वीजनिर्मिती असतानाही केवळ राजकीय स्वार्थापोटी विदर्भ ओसाड झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी आता उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बेमुदत उपोषणासोबतच कायदेभंग, आत्मक्लेशही केले जाणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सदस्य प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार, अरुण केदार, तात्यासाहेब मते, नरेश निमजे, रंजना मामर्डे, अॅड. मृणाल मोरे, अशोक पाटील, सुनीता येरणे, राजेंद्र सतई यांनीही आंदोलनाची घोषणा केली. विदर्भात सर्वाधिक वीजनिर्मिती होते. मुबलक कोळसाही येथे आहे. पाण्याची कमतरता नाही. नैसर्गिक साधनसंपत्ती व खनिजही मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतरही विदर्भाचे लचके तोडण्यात येत आहेत. नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विदर्भाची आर्थिक कोंडी झाली आहे. मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कुपोषणाचे हाल होत आहेत, असे समितीच्या सदस्यांनी सांगितले.

केवळ एखाद्या शहराचा कायापालट झाला म्हणून संपूर्ण विदर्भाचा विकास झाला आहे, असे म्हणता येणार नाही. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप उद्योग नाहीत. बेरोजगारीचे प्रमाण कायम आहे. दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. परंतु त्याची फलनिष्पत्ती नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाची स्थापना सरकारने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपुरातील संविधान चौकात यासाठी उपोषण करण्यात येणार आहे. बुलढाणा येथेही असेच आंदोलन केले जाईल. विदर्भवादी नेत्यांनी व जनतेने गावागावात आंदोलन करावे, रास्ता रोको करावा, असे आवाहनही विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले. बुलढाण्यात अॅड. सुरेश वानखेडे, तेजराव मुंढे, प्रा. राम. बारोटे, विलास फाटे, प्रकाश अवसरमोल, रविकांत आढाव हे आंदोलन करणार आहेत.

सध्या महाराष्ट्रात भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. केंद्रात भाजपला बहुमत आहे. भाजप सुरुवातीपासूनच लहान राज्यांचा समर्थक राहिला आहे. विदर्भासाठीही भाजपच्या नेत्यांनी आंदोलने केली आहेत. अशात अलीकडच्या काही वर्षांत भाजपच्या गटातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर मौन आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती सध्या स्वतंत्र राज्यासाठी एकाकी लढा देत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT