Farmer's Protest in Bhandara Sarkarnama
विदर्भ

Bhandara Farmer Protest : सरकार शेतकऱ्यांसाठी काही नाही करणार, स्वार्थासाठी एक दिवस भारतमातेलाही विकणार

अभिजीत घोरमारे

Congress on BJP : राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकत नाही. उलट स्वार्थापोटी ही मंडळी एक दिवस भारतमातेलाही विकायला मागंपुढं पाहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली. भंडारा येथे गुरुवारी (ता. ९) काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात ते बोलत होते.

भाजप पूर्णत: शेतकरीविरोधी आहे. छत्तीसगडमध्ये धानाची आधारभूत किंमत ३ हजार १०० रुपये देणार, सिलिंडर ५०० रुपयांमध्ये देणार, अशा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. मोदी हे केवळ छत्तीसगडचे पंतप्रधान आहेत का? केवळ एका राज्यापुरते ते ५०० रुपयांत सिलिंडर देणार आहेत का, असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांमध्ये असा दुजाभाव कसा करू शकते याचा जाब भाजपनं द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. (Protest on Farmer's issue at Bhandara in presence of Sate Congress President MLA Nana Patole)

मोदी केवळ जुमलेबाज आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असं त्यांनी सांगितलं होतं. एकाही खात्यात अशी रक्कम जमा झाली असेल, तर त्यांनी सिद्ध करावं, अशी टीका त्यांनी केली. देशात गरिबी अद्यापही कायम आहे. राज्यात आनंदाचा शिधा वाटप करणं, केंद्राकडून ८० कोटी लोकांना मोफत धान्य वितरीत करण्याची घोषणा करणं हे गरिबी कायम असल्याचं सिद्ध करतं, असं ते म्हणाले.

भंडारा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. गोंदियात अनेक व्यापारी बसले आहेत, असं नमूद करीत त्यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना टोला लगावला. या व्यापाऱ्यांनी प्रसारमाध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचं श्रेय घेतलं. परंतु एकाही केंद्रातून अद्याप धानाची उचल करण्यात आलेली नाही ही वस्तुस्थिती असल्याचं पटोले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्यात मोर्चा निघणार असल्यानं पोलिस मागे लावले. हिंमत असेल तर सरकारनं अटक करून दाखवावी, असं जाहीर आव्हान पटोले यांनी दिलं. जतनेच्या मुद्द्यावर आंदोलन करीत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यासाठी येणं अपेक्षित होतं. परंतु अधिकारीही आता राजकारण पडू लागले आहेत. अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये. त्यांनी त्यांचं लोकसेवक म्हणून काम व्यवस्थित करावं. सरकार बदलत राहतात. त्यामुळं अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी विसरू नये, असा सूचक इशाराही पटोले यांनी या वेळी दिला.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT