Amol Fuke and Abhay Rathod, Pusad APMC
Amol Fuke and Abhay Rathod, Pusad APMC Sarkarnama
विदर्भ

Pusad APMC : मनोहर नाईकांनी युवकांना दिली संधी आणि राजकीय समीकरणही जुळवले...

दिनकर गुल्हाने

Yavatmal District's Pusad APMC Election News : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल माधव फुके यांची सभापतिपदी तर अभय रामचंद्र राठोड यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहर नाईक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत युवा नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे. (Naik prioritized youth leadership in the APMC)

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पॅनलने संचालकांच्या सर्व १८ जागा जिंकल्या व बाजार समितीत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. यावेळी नव्या उमेदीच्या युवकाला सभापतिपदी संधी द्यावी, या हेतूने माजी मंत्री मनोहर नाईक यांनी चाचपणी केली. नवी ऊर्जा संचारलेले युवक शेतकऱ्यांशी निगडित सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात, हीच बाब हेरून त्यांनी अमोल फुके यांना यावेळी संधी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवा कार्यकर्ते व माजी संचालक अभय रामचंद्र राठोड यांची उपसभापतिपदी निवड करून राजकीय समीकरण जुळवले. या दोन्ही युवकांना संधी मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे. आज (ता. १८) सकाळी साडेअकरा वाजता श्रेष्ठींच्या आदेशावरून अमोल फुके व अभय राठोड यांनी अनुक्रमे सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर केले. प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

अमोल फुके यांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक अभिजित पवार, अनुमोदक यशवंत चौधरी तसेच अभय राठोड यांच्या अर्जावर सूचक रतीराव राऊत, अनुमोदक छाया देशमुख यांच्या स्वाक्षरी होत्या. बिनविरोध निवड घोषित होताच सभापती व उपसभापती यांच्या चाहत्यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलाल उधळून नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे स्वागत केले. यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते.

पुसद (Pusad) कृषी उत्पन्न बाजार समितीला (APMC) पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया अमोल फुके यांनी व्यक्त केली. सद्यःस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पेयजल व्यवस्था, निवासाची व्यवस्था, अत्यल्प दरात जेवणाची व्यवस्था, शौचालय व स्वच्छता या प्राथमिक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. शेतकऱ्यांचा शेतमाल बरेचदा शेडच्या बाहेर असतो. अनेकदा तो पाण्यात भिजतो. आता अशी पाळी शेतकऱ्यांवर येणार नाही, असे फुके म्हणाले.

शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतमालाला योग्य भाव मिळावा, यादृष्टीने व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा, वेळेवर हर्राशी, शेतमालाचा वजन काटा या बाबींकडे लक्ष देण्यात येईल. शेतमाल विक्रीनंतर दुपारी तीन वाजेपर्यंत शेतकरी मोकळा होईल, या दृष्टीने विचार करण्यात येईल. शेतकऱ्यांची ही संस्था खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठीच चालवण्यात येईल, असे अमोल फुके म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT