RSS Head Quarters
RSS Head Quarters Sarkarnama
विदर्भ

संघ मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी रईस अहमद एटीएसच्या ताब्यात !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : देशाच्या मध्यस्थानी असलेले संघाचे मुख्यालय (RSS Head Quarters) नेहमीच दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर राहिलेले आहे. जुलै २०२१ मध्ये रईस अहमद शेख असदउल्ला खान याने महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसराची रेकी केली होती. नागपूर एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) त्याला ताब्यात घेतले आहे.

एटीएसचे (ATS) अधिकारी रईसची कसून चौकशी करीत आहेत. गेल्या वर्षी रेकी करताना त्याने नागपुरात (Nagpur) कुणाची मदत घेतली होती का, याचाही तपास केला जात आहे. त्याचा नागपूरचा हस्तक कोण, याची माहिती घेतली जात आहे. पाकव्याप्त काश्मिरातील (Kashmir) कमांडर ओमरने रईसला रेकी करायला सांगितले असल्याचे रईसने तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे. मागील वर्षी रईस विमानाने नागपुरात आला होता. तीन दिवस त्याने महालातील संघ मुख्यालय आणि रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसराची रेकी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला पूर्णपणे यश आले नाही, असे सांगितले जात आहे.

गेल्या वर्षी १३ जुलैला नागपुरात आल्यानंतर दोन दिवस त्याने आपले काम केले आणि १५ जुलैला हा दहशतवादी नागपुरातून विमानाने व्हाया दिल्ली काश्‍मीरला परत गेला. जानेवारी महिन्यात काश्‍मीर पोलिसांना त्याला अटक केली आणि गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला. नागपूर एटीएसच्या टिमने त्याला नागपुरात आणले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. आताही तपासात त्याने पाकव्याप्त काश्मीरमधील कमांडर ओमरचेच नाव घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये रईस अहमदने रेकी केल्याची माहिती समोर येताच संघ मुख्यालय परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. याशिवाय हेगडेवार स्मृती भवन भागात ड्रोन्सद्वारे चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. जम्मू काश्‍मीरमध्ये एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रईस अहमदची चौकशी केली असल्याची माहिती आहे. त्यानंतर नागपूरच्या टिमने त्याचा ताबा घेतला आहे. स्थानिक व्यक्तीच्या मदतीशिवाय महाल आणि रेशीमबाग परिसरात रेकी करणे केवळ अशक्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे चौकशीतून आता आणखी काय पुढे येते आणि नागपुरात त्याला कुणा मदत केली होती, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT