Rahul Gandhi-Bharat Jodo Yatra
Rahul Gandhi-Bharat Jodo Yatra Sarkarnama
विदर्भ

Bharat Jodo Yatra :महाराष्ट्राचा पुरोगामी विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ : निरोपावेळी राहुल गांधींचा जनतेला संदेश

सरकारनामा ब्यूरो

जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आज (ता. २२ नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या (Maharashtra) बुलडाणा जिल्ह्यातून मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) प्रवेश करत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संदेश दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेचा प्रारंभ महाराष्ट्रात देगलूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन झाला आणि शिवाजी महाराजांचा मातृजिल्हा (जिजाऊ माँसाहेबांचा जन्म जिल्हा) बुलडाणा येथून ती मध्य प्रदेशमध्ये जात आहे. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ, असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. (Rahul Gandhi gave this message to the people of Maharashtra)

राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा आणि गजानन महाराज तसेच येथील सर्व संतांच्या विचारापासून प्रेरणा घेत आम्ही वाटचाल करणार आहोत. या संतांच्या विचाराने शेकडो वर्ष समतेचा, सामाजिक न्यायाचा, बंधुत्वाचा विचार दिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा, तसेच भारत जोडो यात्रेचा हाच संदेश आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नम्रपणे वाटचाल करत आहोत.

महाराष्ट्रातील जनतेने या यात्रेला प्रचंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिले. आमच्यासोबत बरोबरीने चालले, लाखोंच्या संख्येने नांदेड आणि शेगाव येथील सभेत सहभागी झाले. या सर्व अबालवृद्ध, युवक, महिला यांच्या प्रेमाने आमचे ह्रदय, मन भरून आले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

गांधी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आम्हाला भारतातील समृद्ध विविधतेचे दर्शन झाले. या यात्रेदरम्यान अनेक ऐतिहासिक मंदिरांना, गुरुद्वारांना भेटी देता आल्या, तसेच विठ्ठलाचे पाईक वारकरी, बौद्ध भिक्कू आणि सुफी संप्रदायातील लोक यांच्यासोबत चालताना मनस्वी आनंद झाला. भगवान बिरसा मुंडा यांची १५७ वी जयंती देशातील इतर आदिवासी बांधवांप्रमाणे साजरी केली. इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी महिला शक्तींना घेऊन (शक्तीमार्च) महिला सन्मानाचा संदेश दिला, तसेच या प्रसंगी हजारो आदिवासी महिलांशी संवाद साधता आला व १० हजार महिलांच्या मेळाव्याला संबोधित केले, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.

संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही अशा लोकांचे ऐकल, जे कठोर परिश्रम करतात; परंतु त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न, त्याची कारणमिमांसा करता असे लक्षात आले की, कृषी साहित्याच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ, शेतमालाच्या भावात असलेली अनियमितता आणि फसलेली पीकविमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलेले आहे, हे पाहून मन व्यथित झाले. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हतबल झालेले, आपल्या स्वप्नांचा चुराडा झालेले पाहिले, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.

आदिवासी समुदाय हा या देशाचा मूलनिवासी आहे आणि त्याच्या अधिकारावर गदा आलेली आहे. वन हक्क जमीन २००६ चा कायदा कशा पद्धतीने पायदळी तुटवला जात आहे, हेसुद्धा लक्षात आले. या सगळ्या समस्यांची कारणमिमांसा करताना लक्षात येते की, भाजपचे ‘काही लोकांच्या हातामध्ये सत्ता आणि संपत्ती सिमित ठेवण्याचे धोरण याला कारणीभूत आहे. एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात संस्कृती, धर्म, जात आणि भाषा याचा वापर करून उभे करून संघर्ष उभा करण्याच्या भाजपच्या नितीमुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

गांधी म्हणाले की, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी शाहू, फुले, आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हा राहिलेला आहे आणि हा जाज्वल्य विचार देशाला नेहमी दिशा देत राहिला आहे. हा विचार टिकवण्याचा प्रयत्न अनेक नागरी समुदाय, पुरोगामी विचारांचे कलाकार, साहित्यिक, सिने क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र हे करत आहेत आणि त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आहे, त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी राहीन.

आम्ही अतिशय विनम्रतापूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात असताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देत आहोत. आपण दिलेले प्रेम, प्रचंड मोठा असा प्रतिसाद आणि आपण केलेले आदरातिथ्य याने आम्हाला एक नवीन ऊर्जा दिली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT