Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

Raj Thackeray : राज ठाकरे यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत, मिशन विदर्भ सुरू…

Atul Mehere

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सकाळी नागपूर (Nagpur) रेल्वे स्थानकावर आगमन झाले. हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीने त्यांना हॉटेलपर्यंत नेले. तेथे पोहोचताच हजारो कार्यकर्त्यांनी तेथे गर्दी केली. आजपासून त्यांचा विदर्भ दौरा सुरू झाला आहे.

हॉटेलमधून ठाकरे रवी भवन येथे जाणार आहेत. तेथे पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची बैठक ते घेणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) तब्बल ८ वर्षांनंतर नागपुरात आले आहेत. यापूर्वी २०१४ साली ते आले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी आले होते. पण नागपूर शहरात ते आलेच नाही, तर विमानतळावरून थेट यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी येथे गेले. तेथे मनसेचे उमेदवार राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यानंतर आज प्रथमतः विदर्भात ते आले आहेत.

राज ठाकरे श्‍वान प्रेमी म्हणून ओळखले जातात. मुंबई ते नागपूर या रेल्वेच्या प्रवासात पोलिसांच्या श्‍वानासोबत त्यांनी काही क्षण घालवले. आता पाच दिवस ते विदर्भात असणार आहेत. पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा तर पश्चिम विदर्भातील अमरावती येथे ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. दरम्यान अमरावती येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. नागपुरातील हॉटेलवर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, अविनाश जाधव, प्रवक्ते संदीप देशपांडे आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

आज हजारो कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आहे. आता विदर्भात मनसे मजबूत करण्यासाठी ठाकरे विदर्भात आले आहेत. आमची कुणासोबतही युती नाही आणि आम्ही आगामी निवडणुका स्वबळावर लढणार आहोत, असे राजू उंबरकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. मनसेची युती भाजपसोबत होणार का या प्रश्‍नावर उंबरकर म्हणाले, राज ठाकरेंचे मित्र प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. याचा अर्थ त्यांच्यासोबत आमची युती आहे, असा होत नाही. सध्यातरी स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी आम्ही करत आहोत, असेही उंबरकर म्हणाले.

आता आम्ही ग्रामपंचायतमध्ये एंट्री घेतली आहे. यापुढे नगर पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढणार आहोत. त्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत, असे आदित्य दुरूगकर यांनी सांगितले. तर मनसे स्वबळावर निवडणुका लढणार आहे. आम्हाला कुणासोबतही युती करण्याची गरज नाही. तर आगामी निवडणुकांमध्ये सर्व जागा आम्ही स्वबळावर लढवणार आहोत, असे अविनाश जाधव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT