Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

Raj Thackeray : विधानसभेची उमेदवारी कोणाला? मनसेने सुरू केली चाचपणी

Rajesh Charpe

Nagpur News : राज ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार मनसेचे पदाधिकारी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील सर्व बारा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली असून मंगळवारी रवि भवन येथे बैठका घेऊन चाचपणी करण्यात आली.

मनसेचे नेते बापू धोत्रे आणि गौरव वालकर यांनी रवि भवन येथे जिल्हाध्यक्ष तसेच ग्रामीणच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. उद्या बुधवारी शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत.

नागपूर जिल्ह्याची कार्यकारिणी बदलली तेव्हा राज ठाकरे यांनी आमचे पोट्टे उद्या प्रस्थापितांच्या डोक्यावर वरवंटा फरवतील असे विधान केले होते. ती वेळ आता येऊन ठेपली आहे. विधानसभेची निवडणूक कोण कोण लढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे मागील विधानसभेची निवडणूकसुद्धा मनसेने लढवली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाध्यक्षांचे डिपॉटिज जप्त झाले होते.

वर्षभरापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विदर्भात येऊन भाकरी फिरवली होती. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यापूर्वी काही खास पदाधिकाऱ्यांना विदर्भात आढावा घेण्यासाठी पाठवले होते.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्हानिहाय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. अनेक नव्या दमाच्या नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. आता विधानसभेच्या सर्व जागा लढण्याची घोषणा केली आहे.

तत्पूर्वी मनसेचे नेते (MNS) अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी वर्षभरापूर्वी विदर्भात बरेच दौरे केले होते. नवीन कार्यकारिणी निवडताना या दोघांची भूमिका महत्त्वाची होती. कार्यकारिणी निवडण्यात आल्यानंतर जवळपास वर्षभरापासून एकाही बड्या नेत्याने विदर्भाकडे लक्ष घातले नाही.

त्यामुळे मनसेची संघटना अद्याप एकजूट झाल्याचे दिसत नाही. पदाधिकारी व कार्यकर्ते विखुरले आहेत. आता विधानसभेची निवडणूक लढायची असल्याने पुन्हा सर्वांना एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहे.

विशेष म्हणजे अद्याप एकही पदाधिकाऱ्याने विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवलेली नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात 12 सक्षम उमेदवारांचा शोध घेताना मनसेची चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT