Devendra Bhuyar-Raju Shetty
Devendra Bhuyar-Raju Shetty  Sarkarnama
विदर्भ

राजू शेट्टी अमरावतीत जाऊन करणार आमदार देवेंद्र भुयारांचा फैसला!

गणेश शिंदे

जयसिंगपूर (जि. कोल्हापर) : महाविकास आघाडीत राहूनही शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नसल्याची खंत असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीला रामराम ठोकण्याचा तयारीत आहे. कोल्हापुरात ५ एप्रिलला होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे. त्याआधी स्वाभिमानीचे एकमेव आमदार असणारे देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांची संघटनेतून हकालपट्टी करायची की समज द्यायची, याचा निर्णय अमरावती जिल्ह्यातील वरूड-मोर्शी मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २४ मार्च) होणाऱ्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. (Raju Shetty will make the decision of MLA Devendra Bhuyar in Amravati)

आमदार भुयार चळवळीतून गायब झाले असून, ते स्वाभिमानीशी अंतर ठेवून असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होईल. विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार एकमेव आमदार म्हणून निवडून आले. मात्र, तेव्हापासून भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि चळवळीशी अंतर ठेवून असल्याची खदखद स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहे.

स्वाभिमानीचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी भुयार यांच्या प्रचारासाठी स्वतः यंत्रणा हाताळली होती. मदतही केली होती. नंतरच्या काळात सत्तास्थापनेसाठी स्वाभिमानीने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर आमदार भुयार आणि राष्ट्रवादी यांच्यात चांगलेच सूत जुळले. आमदार भुयार पक्षाच्या कोणत्याच बैठकीला उपस्थित राहत नाहीत किंवा पक्षाचा बिल्लाही छातीला लावत नाहीत, अशा तक्रारी कार्यकर्त्यांकडून आल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना वेळोवेळी समज देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यात बदल होत नसल्याची खंत पक्षश्रेष्ठींना वाटते. आघाडीतील घटक पक्ष असल्याने आमदार भुयार आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंध नजरेआड झाले.

एकरकमी एफआरपी, शेतीला दिवसा वीजपुरवठा यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलने करूनही सरकार दखल घेत नसल्याने स्वाभिमानी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे आमदार भुयार आणि राष्ट्रवादीतील संबंध हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. शेट्टी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २४ मार्च) वरुड येथे होणाऱ्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार भुयार यांचा निर्णय होणार आहे.

भुयारांना दाखवले मंत्रिपदाचे गाजर

देवेंद्र भुयार निवडून आल्यावर त्यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवल्याची चर्चा आहे. मात्र, तसा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीने स्वाभिमानी संघटनेला दिला नव्हता. तशी मागणी किंवा त्या आशयाचा ठरावही राज्य कार्यकारिणीत झालेला नाही, असे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT