Devendra Fadanvis and Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Ram temple News : अयोध्येला चंद्रपुरातून जाणार काष्ट; दोन शोभायात्रा, उद्या फडणवीसांसह युपीचे मंत्रीही येणार !

Devendra Fadanvis : उद्या देवेंद्र फडणवीस चंद्रपूरला येणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Forest Minister Sudhir Mungantiwar News : अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. मंदिराचे गर्भगृह आणि इतर ठिकाणच्या कामासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथून काष्ट उद्या पाठवले जाणार आहेत. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी उद्या बल्लारपूर आणि चंद्रपुरात दोन शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पत्रकार परिषदेत मंत्री मुनगंटीवार म्हणाले, या सोहळ्यासाठी उद्या सायंकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरला येणार आहेत. महाकाली मंदिरापासून ते पुढचा प्रवास ते यात्रेसोबत करतील. त्यानंतर नागपूरच्या कार्यक्रमासाठी रवाना होतील. उत्तरप्रदेशातून काशी विश्‍वनाथ बनारसचे पालकमंत्री रवींद्र जयस्वाल, उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, बलियातून निवडून आलेले वन व पर्यावरण राज्यमंत्री अरुण सक्सेना यांच्यासह खास राम भजनासाठी कैलास खेर उपस्थित राहणार आहेत.

यासंदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले, कारसेवक म्हणून ६ डिसेंबर १९९२ मध्ये मी अयोध्येला गेलो होतो. त्या विवादित स्थानावर लाखो कारसेवक जमा झाले होते. १५२८ मध्ये आक्रमणकाऱ्यांनी धुडगूस माजवला होता. त्यानंतर ‘रोम रोम मे बसता है राम’, ही भावना लक्षात आली, तेव्हा प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थानावर एक ढाचा तयार करण्यात आला. १५२८ पासून शेकडो वर्ष भव्यदिव्य राममंदिर निर्माण व्हावे, ही या देशाच्या सर्व जाती धर्मांतील रामभक्तांची इच्छा होती.

६ डिसेंबर १९९२ ला कारसेवा सुरू झाली. त्या एका घुमटावर कारसेवक चढले. १.५५ वाजता पहिला गुंबर उद्ध्वस्त झाला. त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहिती आहे. कल्याणसिंह यांच्यासह चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना जावे लागले होते. पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान होते. ‘कल्याणसिंहजी कल्याण करो, मंदिर का निर्माण करो, असे नारे देत मोठे जनआंदोलन या देशाने बघितले. त्याच जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयात विजय मिळाल्यावर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र नावाची समिती तयार झाली.

भुपेंद्र मीश्र समितीचे अध्यक्ष आहेत. चंपतराय महासचिव आहेत आणि योगी श्री गोविंदगिरी महाराज कोषाध्यक्ष आहेत. वनमंत्री म्हणून राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण व्हावं आणि पुढचे एक हजार वर्ष हे मंदिर राहावे, हा विचार करून बांधकाम तयार झाले आहे. मंदिरासाठी राजस्थानातून दगड आणले. लोखंड वापरले नाही, तर दगडामध्ये प्रत्येक स्तंभ जुन्या काळातील पद्धतीने हे तयार करण्यात आले. महाद्वार आणि गर्भगृहातील कामासाठी लाकूड लागणार होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की, या मंदिराला लाकूड आपण पाठवावे.

लाकूड पाठवण्याचा प्रस्ताव पाठवावा, हे जेव्हा ठरले. तेव्हा भुपेंद्र मिश्र यांनी हे काम फॉरेस्ट इन्स्टिट्यूटला दिले. काष्ट कोणते वापरावे, हे विचारले. दंडकारण्यात ज्याचा उल्लेख आहे, त्या गडचिरोली आण चंद्रपूर जिल्ह्यातील लाकडाची निवड झाली. ते पुरवण्यासाठी आपल्याला त्यांनी सूचना केली. राजस्थानातून दगड आणला, तर शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून काष्ट आपण राम मंदिरासाठी पाठवत आहो. मंदिराचा महाराष्ट्राशी दुसरा संबंध म्हणजे मूर्तीसाठीच्या शिला. या शिला मा सीतेच्या माहेरहून येत आहेत.

विदर्भाशीसुद्धा प्रभू रामाचे नाते आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे वडील राजा दशरथांची आई इंदुमती ही विदर्भातली (Vidarbha) आहे. लाकूड जसं महाराष्ट्रातून (Maharashtra) त्यांच्या आजीच्या भूमीतून चालले. सर्व रामभक्त मग तो कोणत्याही जाती धर्म, धर्म, पंथाचा असो. याचा प्रत्येकाला आनंद आहे. संकल्प पूर्ण रोण्याचा आणि स्वप्नाची पूर्तता होण्याचा हा आनंदोत्सव उद्या बल्लारपूर आणि चंद्रपूरमध्ये शोभायात्रा काढून साजरा केला जाणार आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT