Ramtek Sarkarnama
विदर्भ

Ramtek Loksabha News : राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे पाय रोवणे सुरू, कॉंग्रेस अजूनही ढिम्मच...

Congress : तेराव्या लोकसभेच्या निवडणुकीत १९९९ मध्ये काॅंग्रेसला खिंडार पडले.

सरकारनामा ब्यूरो

Ramtek Lok Sabha Constituency Analysis : २०२४मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. जवळपास एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. राजकीय वर्तुळात हालचालीला वेग आलेला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव आहेत. शिवसेनेचे दोन गट तयार झाल्याने तसेच प्रत्येक राजकीय पक्षात गटबाजी असल्याने येथील जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला येते, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र राजकीय पक्षाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. (It is seen that the construction of the front of the political party has started)

लोकसभेचा सर्वाधिक मोठा मतदारसंघ म्हणजे रामटेक. निवडणुकीच्या काळात याकडे सर्वच राजकीय नेत्यांच्या नजरा लागून असतात. एके काळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रामटेक लोकसभा क्षेत्र. तेराव्या लोकसभेच्या निवडणुकीत १९९९ मध्ये याला खिंडार पडले आणि शिवसेनेचे सुबोध मोहिते निवडून आले. जतिराम बर्वे, पी. व्ही. नरसिंहराव, तेजसिंहराव भोसले, दत्ता मेघे, चित्रलेखा भोसले आदींसह काँग्रेसचे उमेदवार याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

या क्षेत्रात कॉँग्रेसचा दबदबा होता. पण आता तो काही राहिलेला नाही. भाजप-शिवसेनेची युती असताना रामटेक लोकसभेवर शिवसेनेने बाजी मारली. २००९ साली काँग्रेसचे मुकुल वासनिक याच मतदार संघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ साली मोदी मोदी लाटेत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी रामटेकचा गड काबीज केला.

२०१९ साली शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना संधी दिली. मात्र त्यात काँग्रेसला फारसे यश मिळाले नाही. किशोर गजभिये यांचा एक लाख २६ हजार ७८३ येवढ्या प्रचंड मताधिक्याने पराभव झाला. त्यामुळे येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत रामटेक लोकसभेत कॉँग्रेस कोणत्या नेत्याला लढवणार, याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे.

कृपाल तुमाने शिंदे गटात असल्याने आणि त्यातच रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वालदेखील त्याच गटात असल्याने त्यांचे वजन पडू शकते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना यात गोंधळ असल्याने नेमके शिवसैनिक आणि कार्यकर्ते कोणत्या सेनेत (गटात) पाठिंबा दर्शवितात हे पाहणेही औत्सुक्याचे असणार आहे.

स्वार्थासाठी झालेल्या शिवसेनेच्या फाळणीमुळे मूळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी जरी असली तरी खरी नाराजी निवडणुकीनंतर दिसून पडेल. भाजप आणि सेना (शिंदे गट) यांचे युती हे जगजाहीर आहे. तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि सेना (उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडी यांची एकी कुठवर टिकणार, हेसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर दिसून येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने रामटेक लोकसभा आमच्या वाट्याला असल्याची डरकाळी मारली आणि तसे पाय रोवणे सुरू केले आहे. वरिष्ठ नेत्यांनी नागपूर आणि रामटेक येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि संमेलने सुरू केले. त्याचबरोबर सेनेची (उद्धव ठाकरे गट) पक्षाच्या बळकटीकरणासाठी मागील महिन्यात रामटेक येथे सुषमा अंधारे यांची जाहीर सभा झाल्याने सेनेत नवचैतन्य फुलले आणि सेनेच्या कार्यकर्त्यामध्ये ताकद संचारली.

भाजपने (BJP) मात्र गुप्तचरांच्या माध्यमातून क्षेत्रातील परिस्थिती आणि मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. कॉँग्रेस पक्षातून त्यापद्धतीने कोणत्याही हालचालीचा वेग दिसून येत नसला तरी त्यांनी ‘हात से हात जोडो’, हा उपक्रम राबविल्याने हाही त्यातलाच भाग आहे. हा एक उपक्रम सोडला तर कॉंग्रेस अजूनही ढिम्मच दिसत आहे.

खासदारांची निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्धी..

लोकसभेच्या निवडणुकीला (Election) केवळ एक वर्षाचा कालावधी असल्याने नेत्यामध्ये नवी उर्मी संचारली असल्याचे दिसून येत आहे. रामटेक (Ramtek) लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांचा नुकताच वाढदिवस झाला. पूर्वीपेक्षा यंदा त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर, पोस्टर आणि जाहिराती अधिक झळकल्या. त्यामुळे निवडणुका जवळ असल्याची कल्पना जनतेला आली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT