MLA Ravi Rana with Hanuman Chalisa
MLA Ravi Rana with Hanuman Chalisa Sarkarnama
विदर्भ

राणा मॅजिक : हनुमान चालिसा आत नेणार, अन् भाजपचे सर्व उमेदवार निवडून येणार…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : हनुमान चालिसा पठणावरून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आज मुंबईत मतदानासाठी आले. राज्य सरकारने मला अटक केली असती म्हणून दोन दिवस मुंबईच्या बाहेर होतो आणि आज मतदानासाठी आलो, असे सांगून आज त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरून राणा दाम्पत्याने राज्यभर कल्लोळ उडविला होता. त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रचंड गदारोळ झाला. आता हे हनुमान चालिसा पुराण थांबले, असे वाटत असतानाच त्यांनी पुन्हा हनुमान चालिसाचाच मुद्दा पुढे केला आहे. हनुमान चालिसा सोबत ठेवून मी कोणताही गुन्हा करीत नाही. ती माझ्याकडे नेहमी असतेच आणि आत्ताही आहे, असे आमदार राणा (MLA Ravi Rana) यांनी आज मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलताना सांगितले.

आज पुन्हा हनुमान चालिसा पुढे करत आमदार राणा म्हणाले की, माझ्या घरी अमरावतीलाही पोलिस पाठवण्यात आले. माझ्यावर दबाव टाकण्यासाठी आणि मला थांबवण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून हे सर्व कारस्थान केले जात आहे. मी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत द्यावे, म्हणून हा सर्व खटाटोप केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पण राज्य सरकार काहीही करून घेईन, पण मला थांबवू शकणार नाही. त्यांच्या या कारस्थानांमुळेच मी दोन दिवस मुंबईच्या बाहेर होतो आणि आज थेट मतदान करायला आलो, असे ते म्हणाले.

मी जर पोलिसांना दिसलो जरी असतो, तर कुठल्याही क्षणी मला अटक करण्यात आली असती. हे जाणून असल्यामुळे मला माझी सुरक्षा करावी लागली. आता पोलिस मला रोखू शकत नाही. मी मतदान करणारच. आतमध्ये हनुमान चालिसा घेऊन जाणार आणि भाजपचे सर्व उमेदवार निवडून येणार, असेही आमदार राणा आज म्हणाले. आता त्यांची हनुमान चालिसा मॅजिक किती चालली, हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT