Dr. Ashish Deshmukh vs MLA Sunil Kedar News : आज सावनेरचा विकास खुंटला आहे. राजकीय स्वार्थासाठी जनप्रतिनिधी जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमदार हा समाजासाठी स्वत:ला झोकून देणारा असावा. परंतु, विधानसभेत या क्षेत्राचा आवाज कमजोर झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आता लोकांना बदल हवा आहे. नवे नेतृत्व जनतेला न्याय मिळवून देऊ शकेल, असे राज्याचे माजी कृषिमंत्री रणजीत देशमुख म्हणाले. (The voice of this sector was weakened in the assembly)
काल (ता. २९) रणजीत देशमुख यांचा अभीष्टचिंतन समारंभ नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील हेटी (सुर्ला) येथे झाला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, सावनेरमध्ये हल्ली गुन्हेगारी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. नवे उद्योग यावेत, यासाठी विद्यमान आमदारांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. आमदारच रेतीच्या व्यवसायात गुंतला असेल तर जनतेने कोणाकडे जावे, हा मोठा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी नाव न घेता आमदार सुनील केदार यांच्यावर थेट हल्ला चढवला.
सर्वांनी ठरवल्यास जनप्रतिनिधी बदलणे सहज शक्य आहे आणि जनतेला आता बदल हवा आहे. तेव्हा, सावनेरचा जनप्रतिनिधी बदला आणि सावनेर मध्ये परिवर्तन घडवा”, असे आवाहन रणजीत देशमुख यांनी जनतेला करून काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख सावनेरमधून लढणार असल्याचे सुतोवाच केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक धोटे होते आणि रमेश मानकर, चंद्रशेखर बरेठीया, प्रफुल्ल मोहोटे, बाबासाहेब वासाडे आदींची यावेळी उपस्थिती होती. रणजीत देशमुख यांचा अभीष्टचिंतन समारंभ सावनेर तालुक्यात करण्याचा उद्देशच मुळी डॉ. आशिष देशमुख यांचे शक्तिप्रदर्शन करण्याच होता, असे आता बोलले जात आहे. काटोलमधून आमदार झाल्यानंतर डॉ. आशिष देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून लढले होते आणि आता ते सावनेरमधून केदारांना टक्कर देणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जुने वैर..
१९८५ ते १९९० आणि १९९० ते १९९५ या काळात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख सावनेर विधानसभा मतदार संघातून आमदार राहिलेले आहेत. ते राज्याचे कृषिमंत्री झाले. ते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होते. पण १९९५च्या निवडणुकीत सुनील केदार यांनी रणजीत देशमुख यांचा पराभव केला. त्या निवडणुकीनंतर शिवसेना - भाजप युती सरकारच्या काळात केदार मंत्रिसुद्धा राहिले.
१९९५ मध्ये ते ऊर्जा, बंदर आणि परिवहन राज्यमंत्री होते. १९९५ ते आजतागायत १९९९ चा अपवाद वगळता ते पराभूत झाले नाहीत. १९९९ मध्ये भाजपचे आमदार देवराव आसोले यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर भाजपने कधीच या मतदारसंघात विजय मिळवला नाही. २०१४ मध्ये संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती. त्या लाटेत अनेक दिग्गजांना घरी बसावं लागलं. मात्र, केदार यांनी या लाटेतही निसटता का होईना विजय मिळवून सीट राखली होती.
आता डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी वडील रणजीत देशमुख यांच्या पराभवाचा बदला घेण्याचा निर्धार केल्याचे गेल्या काही दिवसांमधील घडामोडींवरून दिसत आहे. दरम्यान त्यांनी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanis) यांनी डॉ. आशिष देशमुख यांच्या घरी भेट दिली होती. या सर्व घडामोडींवरून डॉ. आशिष पुन्हा हाती कमळ घेऊन सुनील केदारांना टक्कर देण्यासाठी उतरणार, असे दिसतंय.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.