eknath shinde | devendra fadnavis sarkarnama
विदर्भ

Assembly Election 2024 : अपक्ष आमदारानं दिला भाजप अन् शिंदे गटाला '440 व्होल्ट'चा झटका

Ravi rana : महायुतीत अद्याप जागावाटपाबद्दल कोणतीही चर्चा सुरू नाही. असे असताना आमदार राणा यांनी यापूर्वीच मतदारसंघावर दावा ठोकल्यानं महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Akshay Sabale

लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचा 'फड' रंगणार आहे. हा 'फड' रंगण्यापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून कुस्त्या रंगल्या आहेत. मात्र, आमदार रवी राणा यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे.

महायुतीचे उमेदवार आपणच असणार आहे. तसा 'ग्रीन सिग्नल' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याकडून मिळाल्याचा दावा ठासून आमदार राणा यांनी मंगळवारी ( 10 सप्टेंबर ) केला आहे. आमदार रवी राणा यांच्या दाव्यानंतर महायुतीतील इच्छुकांना '440 व्होल्ट'चा 'जोर का झटका बसला' आहे.

लोकसभा निवडणुकीत '45 पार'चे दिवास्वप्न पाहणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीला 31 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 'ताकही फुकूंन पिलं' जात आहे. पण, अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत आल्यानं अनेक ठिकाणी जागावाटपारून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या राज्य नेतृत्त्वानं गृहमंत्री अमित शाह यांच्यापुढे 25 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे.

यातच, "महायुतीतील घटकपक्ष म्हणून युवा स्वाभिमानी पक्षाला बडनेरा मतदारसंघ वाट्याला येणार आहे. मीच उमेदवार असेल. माझ्या उमेदवारीला भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार देत 'ग्रीन सिग्नल' दिला आहे," असा दावा आमदार रवी राणा ( Ravi Rana ) यांनी केला. एवढेच नव्हे, तर महायुतीतून विधानसभेसाठी पाच ते सहा जागांच्या मागणीचा प्रस्तावही दिल्याचं आमदार राणा यांनी म्हटलं.

"भाजपने बडनेरा मतदारसंघावर दावा केला नाही, तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी ज्या 25 जागा मागितल्या, त्यात अमरावती विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे," असं आमदार राणा यांनी सांगितलं.

मात्र, महायुतीत अद्याप जागावाटपाबद्दल कोणतीही चर्चा सुरू नाही. पुढील आठवड्यात दिल्लीत गृहमंत्री शाह यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. त्यात जागावाटपाबद्दल चर्चा होऊ शकते. असे असताना आमदार राणा यांनी यापूर्वीच बडनेऱ्यावर दावा ठोकल्यानं महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजप अन् शिंदे गटातील इच्छुक काय करणार?

बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा हे विद्यमान आमदार आहेत. ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. त्यामुळे जागावाटपाआधीच आमदार राणा यांनी बडनेरा मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना मिळालेल्या 26 हजार 763 मतांचा आधार घेत भाजप आणि शिंदे गटाकडून बडनेरा मतदारसंघावर दावा केला जात होता. पण, रवी राणांच्या निर्णयामुळे भाजप आणि शिंदे गट काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT