<div class="paragraphs"><p>Ravikant Tupkar</p></div>

Ravikant Tupkar

 

Sarkarnama

विदर्भ

रविकांत तुपकरांनी केली वायदेबंदीच्या आदेशाची होळी…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : केंद्र सरकारने अचानक सोयाबीन, सोयातेल, कच्चे पामतेल, हरभरा, मूग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरी तेल या शेतीमालाच्या वायदेबाजारातील व्यवहारांवर बंदी आणल्याने, सोयाबीनच्या व इतर शेतीमालाच्या दरांत घसरण झाली आहे. त्यामुळे बुलडाण्यात (Buldana) स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांच्या (Ravikant Tupkar) नेतृत्वात बुलडाण्यातील (Buldana) चिखली रोडवर वायदेबंदीच्या आदेशाची होळी करून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.

केंद्र सरकारचा हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा आहे. इतर राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. शहरी ग्राहकांना स्वस्तात शेतमाल व अन्नधान्य मिळाले पाहिजे, या हेतूने केंद्र सरकारने सेबीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांवर मोठा विपरीत परिणाम होणार आहे. हा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावा. वायदेबाजारात सट्टेबाजांचाच फायदा होतो व त्यात अजून अनेक त्रुटी आहेत म्हणून वायदेबाजारातील काही बाबींना शिस्त लावणे व सुधारणा करणे गरजेचे आहे असेही तुपकर म्हणाले. या निर्णयाच्या बाबतीत फेरविचार न केल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही तुपकरांनी दिला.

कॉंग्रेस नगरसेविका इशरत परवीनसह शेकडोंचा स्वाभिमानीत प्रवेश..

शहरातील मिर्झा नगर येथील कॉंग्रेसचे कार्यकर्ते मो. अजहर मो. एजाज यांनी त्यांच्या पत्नी नगरसेविका इशरत परवीन मो. अजहर आणि आपल्या शेकडो समर्थकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश घेतला. या सर्वांचे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेत स्वागत केले. शहरी भागातही संघटनेला मिळत असलेले बळ हे शेतकरी चळवळीला सशक्त करत असल्याचे प्रतिपादन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.

गावखेड्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रस्थ झपाट्याने वाढत असताना आता शहरी भागात देखील लोकांचा कल संघटनेकडे वाढत आहे. दरम्यान नगर पालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सध्या सुरुवात झाली असताना कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आणि नगरसेविका यांनी संघटनेत प्रवेश घेतल्याने येणाऱ्या काळात 'स्वाभिमानी'ची नगर पालिकेत धडाकेबाज एन्ट्री होण्याचे संकेत आहेत. स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे २१ डिसेंबर रोजी हा प्रवेश सोहळा पार पडला. समाजसेवक मो. अजहर मो. एजाज यांनी त्यांच्या पत्नी नगरसेविका इशरत परवीन मो. अजहर यांच्यासह आपल्या शेकडो समर्थकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश घेतला.

यावेळी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या सर्वांचे संघटनेत स्वागत केले. यावेळी बोलताना मो. अजहर म्हणाले की, रविकांत तुपकर यांच्या कार्याने प्रभावित होऊन समर्थकांसह मोठ्या स्वाभिमानाने 'स्वाभिमानी'त दाखल झालो आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी सातत्याने लढा देणारे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शहरात 'स्वाभिमानी'ची ताकद वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर रविकांत तुपकर यांनी यावेळी बोलताना 'स्वाभिमानी' केवळ शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागातील जनतेसाठी लढणारी संघटना नसून शहरी भागातील नागरिकांच्या हितासाठी देखील आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरण्याचे काम केले आहे. त्यामुळे शहरी भागातही संघटनेकडे तरुणांचा ओढा वाढत असल्याचे समाधानकारक चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

मो. अजहर व त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशाने संघटनेला शहरात अधिक बळ मिळाले असून त्यांचा संघटनेत योग्य सन्मान केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. शहरी भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने मो. अजहर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी दिली. प्रवेशाच्या वेळी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले, शेख रफिक शेख करीम, पवन देशमुख, प्रदीप शेळके, आकाश माळोदे, दत्ता जेऊघाले, उमेश राजपूत, अंकुश सुसर, नितीन अग्रवाल, महेंद्र जाधव, विनायक सरनाईक, भारत वाघमारे, शुभम डुकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन ॲड. राज शेख यांनी केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT