Samriddhi Highway News : समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण सुविधा नव्हत्या. तरीही केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी घाई गडबडीत समृद्धीचे लोकार्पण करण्यात आले. आजवर शेकडोंच्या संख्येत बळी गेले, जायबंदी झालेत. त्यामुळे या मृत्यूप्रकरणी राज्य शासनावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केली आहे.
महामार्गावर झालेल्या सर्वच अपघात व मृत्यूंसाठी सरकार जबाबदार आहे. महामार्गावर परिपूर्ण सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी शासनाला आणखी किती बळी हवे आहेत ? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. १५ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला, १ जुलैला बुलडाण्यात २५ जणांचे बळी गेले, या महामार्गावर सुरक्षेच्या उपायोजना करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्गावर लोकांचे जीव जात आहेत आणि राज्यकर्ते निष्क्रीयपणे फक्त बघत आहेत, असा हल्लाबोल तुपकरांनी केला.
राज्याची भाग्यरेषा म्हणून ज्या समृद्धी महामार्गाची ओळख आहे, तोच मार्ग आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यापासून बुलडाणा (Buldana) जिल्ह्यामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. डिसेंबर 2022 ला महामार्ग सुरू झाल्यापासून बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 200 अपघात झाले आहेत. बुलडाणा जिल्हा वगळता इतर भागात अपघाताचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातच अपघाताचे प्रमाण अधिक का आहे याची कारणे शोधण्याची गरज आता निर्माण झाली आहे, असे तुपकर यांनी नमूद केले.
लेन कटिंग हे अपघाताचे एक प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्गावर वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे पुढे आले आहे. तसेच ट्रकचालक हे लेन चेंज करताना नियमांचे पालन करत नसल्याचेही समोर आले आहे. रस्त्यावर काही अंतरावर विश्रांती थांबे तयार करणे आवश्यक आहे. वाहनचालकांना विश्रांती मिळत नाही आणि दूरवर असलेल्या रस्त्यांवर अन्य काहीही नसल्याने वाहकांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येत नाही, या बाबींचा विचार व्हायला हवा, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.
महामार्ग सेवेत दाखल झाल्यापासून 203 दिवसांत 450 अपघात होऊन 97 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंतचा सर्वांत भीषण अपघातही बुलडाणा जिल्ह्यातच झाला आहे. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल कंपनीच्या बसला बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनीअरिंग शाखेच्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांनी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे कारण शोधण्यासाठी तीन महिने संशोधन केले. त्यातून जे निष्कर्ष निघाले त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने (State Government) करावी, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.