Ravikant Tupkar News : आंदोलनातील गुन्ह्यांत रविकांत तुपकरांना दिलेला जामीन रद्द करून त्यांना तुरुंगात ठेवावे, अशी मागणी पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेली आहे. तुपकरांना पुन्हा जामीन मिळतो की तुरुंगात जावे लागते, यावर आता २१ फेब्रुवारी रोजी फैसला होणार आहे. या प्रकरणी न्यायालयात १६ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तिवाद केला.
या प्रकरणी न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून, २१ फेब्रुवारी रोजी नेमका काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी आजवर विविध आंदोलने केली आहेत. याच दरम्यान रेल्वे रोको पार्श्वभूमीवर आंदोलन होण्यापूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकरांना अटक केली होती.
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 151 (3) अन्वये 18-01-2024 रोजी तुपकरांना अटक करून 19-01-2024 रोजी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलडाणा यांच्या समक्ष हजर करून तुरुंगात पाठविण्याची मागणी केली होती. न्यायालयाने उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून पोलिसांची विनंती फेटाळून लावली व तुपकर यांची मुक्तता केली होती. त्या आदेशांविरोधात बुलडाणा शहर पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालय बुलडाणा येथे पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यामध्ये तुपकरांच्या इतर आंदोलनाच्या गुन्ह्यांचा संबंध जोडून त्यांना अटकेत ठेवण्याची मागणी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रकरणी यापूर्वी ७ व ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. त्यावेळी रविकांत तुपकर स्वतः न्यायाधीशांच्या समोर हजर झाले होते, तर त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवत १५ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी ठेवली होती. न्यायालयाचा निकाल काहीही येऊ शकतो वेळ प्रसंगी आपल्याला तुरुंगात जाण्याची वेळसुद्धा येऊ शकते. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी १५ फेब्रुवारी रोजी निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या भावना मोकळ्या केल्या.
निर्धार मेळाव्याला अपेक्षेपेक्षा खूप मोठा प्रतिसाद मिळाला. तुपकरांचे समर्थक व सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गर्दी या मेळाव्यात दिसून आली. ही सर्वसामान्य जनता हीच आपली खरी संपत्ती आणि आपली खरी ताकद आहे. त्यामुळे आता तुरुंगात जाण्याची भीती नाही. तुरुंगात गेलो तरी तुरुंगातून खासदारकीचा अर्ज भरणार आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने लोकसभा निवडणूक लढणार, असा निर्धार या वेळी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यानंतर रविकांत तुपकर न्यायालयात हजर झाले होते, परंतु तुपकरांच्या वतीने वकील ॲड. शर्वरी तुपकर यांनी दाखल केलेल्या कायदेशीर पुराव्यावर युक्तिवाद करण्यासाठी सरकारी पक्षाने वेळ मागितल्याने या प्रकरणाची सुनावणी १६ फेब्रुवारीला ठेवण्यात आली. त्यानुसार रविकांत तुपकर पुन्हा न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयात दोन्ही पक्षांनी पुन्हा जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. २१ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. रविकांत तुपकर यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावे लागणार, यासाठी आता २१ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.