Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

रविकांत तुपकर म्हणाले, त्यांनी भाव मिळवून घेतला; आता आपली ताकद दाखवण्याची वेळ...

Atul Mehere

नागपूर : पावसाने सोयाबीन, कापूस यांसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान केले असून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, सोयाबीन - कापसाचे दर स्थिर राहण्यासाठी निश्चित धोरण ठरवावे, यांसह शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांसाठी आक्रमक शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले आहे.

६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात (Buldana) एलगार मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) जिल्हाभर दौरा करत आहेत. दरम्यान १९ ऑक्टोबर रोजी शेगाव तालुक्यात त्यांच्या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांचा (Farmers) उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. गावोगावी शेतकऱ्यांनी समर्थन दाखवत या आंदोलनाला पाठिंबा दिला, रात्री उशिरापर्यंत गावोगावी झालेल्या बैठका, सभांना शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एलगार मोर्चाच्या पार्श्वभूमिवर रविकांत तुपकर यांनी नुकताच शेगाव तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच बऱ्याच ठिकाणी त्यांनी शेतांत जाऊन पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जवळा बुद्रूक, भोनगाव, जलंब रेल्वे, माटरगाव व पहूरजीरा आदी ठिकाणी सभा झाल्या. या सभांना शेतकरी, शेतमजूर, युवक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या उपस्थितीवरून शेतकऱ्यांच्या मनातील प्रशासन आणि शासना विरोधातील रोष तसेच मोर्चाला असलेला पाठिंबा दिसून आला. पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊ, शेतकरी म्हणून एकत्र येऊ असा नारा देत रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून उसाला आणि दुधाला भाव मिळवून घेतला. त्याच धर्तीवर सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एल्गार मोर्चासाठी एकत्र येऊन आपली ताकद दाखवून देण्याची ही वेळ आहे. बुलडाणा हे सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे केंद्र झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गावातून शेतकऱ्यांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी सभेत केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी हा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा शब्द तुपकरांना दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे, वासुदेव उन्हाळे, गजानन बिल्लेवार, विजय पडोळे, गिरीधर देशमुख, अक्षय फरफट, दिनकर म्हसणे, गजानन पटोकार, दत्तात्रय जेऊघाले, संजय खारे, रविंद्र जेऊघाले व शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT