बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना सराईत गुन्हेगार ठरवलं आहे. तुपकर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांची मागील गुन्ह्यातील जमानत रद्द करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी, अशी मागणी बुलढाणा शहर पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाकडे एका अर्जाद्वारे केली आहे.
तुपकर यांना सराईत आणि गंभीर गुन्हेगार संबोधून त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा शहर पोलिसांनी केलेली मागणी आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक असल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आजवर रस्त्यावर उतरून अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे दोन वर्षांपूर्वी सोयाबीन आणि कापसाला चांगले दर मिळाले आणि शेतकरी सुखावले होते.
गेल्या वर्षी बुलढाण्यातील महामोर्चा आणि मुंबईतील अरबी समुद्रातील जलसमाधी व त्यानंतर केलेल्या आत्मदहन आंदोलनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीकविमा व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई, असे तब्बल 517 कोटी रुपये मिळाले, हे त्यांच्या आंदोलनाचे यश आहे. त्यानंतर यावर्षीदेखील रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात भव्य असा एल्गार मोर्चा बुलढाण्यात निघाला. त्यानंतर रविकांत तुपकरांनी मंत्रालय ताब्यात घेण्याचा गंभीर इशारा दिला होता. तेव्हाही पोलिसांनी तुपकरांना अटक केली होती.
ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयाने त्यांची मुक्तता केली होती. त्यानंतर रविकांत तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. अन्नत्याग कायम ठेवून त्यांनी हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत धडक दिली होती. त्यानंतर सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली होती, परंतु त्यानंतरही सरकारचे आश्वासन न पाळल्याने नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन केले, त्यानंतरही सरकारने दखल न घेतल्याने तुपकरांनी १९ जानेवारी रोजी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु रेल्वेरॊकॊ आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकरांना अटक केली होती.
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 151 (3) अन्वये 18 जानेवारी रोजी तुपकरांना अटक करून 19 जानेवारी रोजी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलढाणा यांचे समक्ष हजर करून पुढील 14 दिवस स्थानबद्ध ठेवण्यास विनंती केली होती. न्यायालयाने उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून पोलिसांची वरील विनंती फेटाळून लावली व तुपकर यांची मुक्तता केली होती. त्या आदेशाविरोधात पोलीस स्टेशन बुलढाणा शहर यांनी सत्र न्यायालय बुलढाणा येथे पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे. बुलढाणा शहर पोलिसांनी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलढाणा यांनी (श्री.पी.बी.देशपांडे) यांनी इस्तेगाशा क्र. 1/24 वर 19 जानेवारी रोजी पारित केलेल्या आदेशास आव्हानित केले आहे.
रविकांत तुपकर यांच्या विरुद्ध 21 निरनिराळे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. रविकांत तुपकर हे सराईत गुन्हेगार असून त्यांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय सहभाग असतो. तुपकर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. सर्वसामान्यांचे जन जीवन विस्कळीत होत असून जनतेस वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई योग्य असून त्यांची तुरुंगात रवानगी करावी, असे पोलिसांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विशेष म्हणजे या प्रकरणाची तारीख आज 1 फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात ठेवण्यात आली होती आणि त्याची नोटीस तुपकरांना दुपारी दीड वाजता मिळाली म्हणजेच काहीही करून पोलिसांना रविकांत तुपकर यांना तुरुंगात डांबायचेच आहे, असे यावरून दिसून येत आहे. शेतमालाला भाव मागणे शेतकऱ्यांना मदत मागणे हा गुन्हा असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांना सराईत गुन्हेगार संबोधून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा हा डाव पोलिस नेमका कशासाठी करीत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना पडला आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.