Ravikant Tupkar in Farmer's Meeting Sarkarnama
विदर्भ

Ravikant Tupkar : सोयाबीन-कापसाच्या मुद्द्यावरील तुपकरांच्या आंदोलनानं धरला जोर

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana News : आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आरपारची भूमिका घेतलीय. सध्या तुपकरांची एल्गार रथयात्रा सुरू आहे. रथयात्रेने चांगलाच जोर धरला असून, शेतकऱ्यांचा त्याला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच सरकारला घेरण्याची तयारी तुपकर यांनी पूर्ण केल्याचे या रथयात्रेतील प्रतिसादावरून दिसत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून ५ नोव्हेंबरला एल्गार रथयात्रा सुरू झाली. आत २० नोव्हेंबरला एल्गार रथयात्रेचे रूपांतर एल्गार महामोर्चात होणार आहे. या महामोर्चाच्या निमित्ताने केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे, तर सोयाबीन-कापूस उत्पादक पट्ट्यातील लाखो शेतकरी बुलडाणा शहरात धडकणार आहेत. महामोर्चात तुपकर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे. (Ravikant Tupkar's Protest March For Farmer's Getting Huge Response May Siege State Government During Assembly Winter Session At Nagpur)

गावागावांतून शेतकरी रस्त्यावर उतरत असल्याने हे आंदोलन आता चांगलंच पेटण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकरांनी आंदोलन करीत सरकारच्या नाकीनऊ आणले होते. बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानादेखील तुपकर पोलिसांच्या वेशात आले आणि अंगावर रॉकेल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या आंदोलनामुळे मोठी खळबळ उडाली होती.

तुपकरांच्या या आंदोलनामुळै शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी मदत मिळाली. त्यामुळे एल्गार महामोर्चाच्या माध्यमातून पुन्हा काही तरी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच शेतकरी तुपकरांच्या पाठीशी उभे राहात आहेत. मात्र, एल्गार महामोर्चात तुपकर आंदोलनाची नेमकी दिशा काय ठरवतात, याचीही मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यंदा शेतकऱ्यांची परिस्थिती आधीपेक्षाही बिकट आहे. अत्यल्प पावसामुळे उत्पादनात घट झालीय. उत्पादन खर्च वाढला आहे. सोयाबीनचा एकरी खर्च ३६ हजार, तर उत्पन्न केवळ १८ हजार होत आहे. कापसाचा एकरी खर्च ४० हजार आणि उत्पन्न ३५ हजार अशी परिस्थिती आहे. सोयाबीनला किमान ९ हजार तर कापसाला १२ हजार भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या अंगावर यंदाच्या दिवाळीत नवीन कपडे नव्हते. मात्र, असंवेदनशील सरकार सत्तेच्या मस्तीत गुंग आहे. गावगाड्यातला शेतकरी आता आपल्या हक्कांसाठी जागृत झाला आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना गृहीत धरू नये, असं तुपकर म्हणाले.

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवून देणार आहोत. सरकारला जागं करणार आहोत, असा इशाराही तुपकर यांनी एल्गार यात्रेदरम्यान धामणगाव बढे येथील सभेत दिला. आता २० नोव्हेंबरला बुलडाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चात तुपकर कोणती घोषणा करतात, याची प्रतीक्षा साऱ्यांना आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT