Nana Patole, Congress

 

Sarkarnama

विदर्भ

प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातच बंडखोरी : नानांनी रात्रीतून केले निलंबन...

दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणे स्वतःचाच जिल्हा नानांना सांभाळता आला नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. भंडारा जिल्ह्यातच कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नानांच्या (Nana Patole) विरोधात बंडखोरी केली

Abhijeet Ghormare

भंडारा : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद हाती आल्यानंतर राज्यभरातील कॉंग्रेसमध्ये जान फुंकण्याचे काम नाना पटोले (Nana Patole) यांनी केले. मात्र दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणे स्वतःचाच जिल्हा नानांना सांभाळता आला नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. त्याला कारण म्हणजे भंडारा जिल्ह्यातच कॉंग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांनी नानांच्या विरोधात बंडखोरी केली आणि नानांनी रातोरात या ५ पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

कॉंग्रेसच्या पाच पदाधिकाऱ्यांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केले. अपक्ष उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका या पदाधिकाऱ्यांवर ठेवून त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजकपूर राऊत, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंग निशाने, ठाण्याचे जिल्हा परिषद प्रभारी मुन्ना भोंगडे, ठाणा पंचायत समितीचे प्रभारी जितेंद्र पडोळे या पाच जणांना रातोरात निलंबित करण्यात आले आहे.

५ पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यासाठी कॉंग्रेस प्रशासन व संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांनी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांना पत्र दिले आहे. ‘पाच पदाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करा अपक्ष उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचे प्रदेश कार्यालयाकडे लेखी स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांचे हे कृत्य पक्षविरोधी असल्याने प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून त्यांना पुढील ६ वर्षांसाठी कॉंग्रेस पक्षातून निलंबित करण्यात येत आहे. तरी सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून त्वरित कळवावे.’

ठाणा परसोडी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्याला उमेदवारी न देता भारतीय जनता पक्षातून आयात केलेल्या व्यक्तीला कॉंग्रेसची उमेदवारी दिली गेली. असा निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. आम्ही वर्षानुवर्षांपासून पक्ष वाढीसाठी कार्य करीत आहोत आणि ऐन वेळेवर आयात केलेल्यांना उमेदवारी दिली जाते. हा आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा कार्यक्रम कॉंग्रेसमध्ये सध्या सुरू आहे. याला आमचा विरोध असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच कॉंग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात बंडखोरी उफाळून आली आहे. म्हणून नानांवर रात्री उशिरा पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची वेळ आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT