Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar News: एकदा नव्हे, तर दहा वेळा त्यांना चौकशी करण्याचा अधिकार...

सरकारनामा ब्यूरो

Mahavikas Aghadi News : सरकार आल्यानंतर त्यांना एकदा नाही, तर दहा वेळा चौकशी करण्याचा अधिकार आहे. याअगोदरही आपण बघितलं की दोन-अडीच वर्ष त्यांनी अनेकांच्या चौकश्‍या केल्या. कधी जलयुक्त शिवाराची, कधी वृक्षलागवडीची, खासदार नवनीत राणा, (Navnit Rana) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांची चौकशी केली. तो त्यांचा आणि जनतेचाही अधिकार आहे. जे लोक सुडाचं राजकारण करतात, त्याने सत्तेत येण्याची संधी देऊ नये, असे माझे जनतेला आवाहन आहे, असे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांना क्लिन चीट मिळाली आहे. त्यावर आमचे सरकार आल्यावर आम्ही पुन्हा त्यांची चौकशी करू, असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले होते, त्यावर मुनगंटीवार यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. नागपुरात आल्यानंतर विमानतळावर (Nagpur Airport) ते पत्रकारांशी बोलत होते. १७ डिसेंबरला महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा आहे, त्याबद्दल विचारले असता, भाजप नेत्यांकडून काही चूक झाली असेल, तर त्यांनी माफीही मागितली आहे. प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील यांनी एकदा नव्हे तर तिनदा माफी मागितली आहे. तरीही ते मोर्चा काढत असतील आणि लोकांना त्रास देण्याचे त्यांनी निश्‍चितच केले असेल, तर ती जनता आहे. त्यांना सर्व माहिती आहे आणि पुढील निवडणुकीत आपल्याला दिसेलच, असे मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल किंवा सध्या वाद उत्पन्न केले जात असलेली कुठलेही विषय असतील, तर त्यावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे. यापूर्वी कोणत्या कोणत्या नेत्यांनी काय काय वक्तव्य केले, हे त्यातून लक्षात येईल. त्याच चर्चेत सावरकरंविषयीची भूमिका शिवसेनेने स्पष्ट करावी. भाषण करताना भाजप नेत्यांनी जे काही चुकीचे शब्द वापरले, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण सावरकरांबद्दल ज्यांनी कुणी अपशब्द वापरले, त्यांनी अद्यापही दिलगिरी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे चर्चेसाठी आम्ही तयार आहोत आणि ज्यांनी ज्यांनी महामानवांबद्दल अपशब्द वापरले आणि माफी मागितली नाही, त्यांना शिक्षा केली पाहिजे, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

काही लोकांनी तर प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांनाही सोडलेले नाही. शिवसेनेच्या एका नेत्याने त्यांच्याबद्दल अतिशय घाण शब्द वापरले आहेत. देवांबद्दलही निंदा केली जाते. अशा लोकांसाठी कडक कायदा केला पाहिजे आणि आम्ही असा कायदा करायला तयार आहोत. विद्येची देवता माता सरस्वतीबद्दल काही नेते कारण नसताना अपशब्द वापरतात. अशा लोकांसाठी कायद्याची चौकट तयार करण्याचा प्रयत्न राहील, असेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT