Amravati RPI Politics : सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. अशात अमरावतीच्या दर्यापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांनी कार्यकर्ता मेळावा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मेळाव्यातून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. गवई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइं गवई गटाचे नेते राजेंद्र गवई आग्रही आहेत. आपल्याला अद्याप महाविकास आघाडीने कोणत्याही बैठकीला बोलविलेले नाही. महाविकास आघाडीने रिपाइंचा आतापर्यंत वापर केला, असे वक्तव्य राजेंद्र गवई यांनी यावेळी केले. आपल्याला महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी. अन्यथा अमरावतीत महाविकास आघाडीचा उमेदवार लोकसभेचा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवू व महाविकास आघाडीचा उमेदवार पाडू, असा इशाराच गवई यांना दिला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिल्लीत नेत्यांना भेटायला जाणार नाही. रिपाइंला उमेदवारी द्यायची असेल तर आमच्याकडे अमरावती येऊन ती द्यावी. कोणत्याही परिस्थितीत आपण दिल्लीला जाणार नाही. काँग्रेसला दिल्लीतील नेत्यांनी विचारले तर त्यांनी आपले नाव सांगावे. तसे न केल्यास त्याला स्थानिक काँग्रेस नेते जबाबदार राहतील, असा इशाराही गवई यांनी महाविकास आघाडीला देऊन टाकला.
रिपब्लिकन ऐक्य आताही होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला मूळ पक्ष आपल्याकडे आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या मूळ पक्षात यावे. या रिपब्लिकन ऐक्याचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्हावे. रामदास आठवले व जोगेंद्र कवाडे यांना आपण यासाठी तयार करतो. त्यांना रिपब्लिकन पक्षातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे पदही देऊ. तीनही नेते जर एकत्र आले नाही तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, अशी ठाम भूमिका राजेंद्र गवई यांनी मांडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजेंद्र गवई यांनी सोमवारी (ता. पाच) अमरावती लोकसभा निवडणुकीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच टेन्शन वाढले आहे. पुढे राजेंद्र गवई काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीमध्ये अमरावतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सुटणार आहे. महायुतीमध्ये भाजपचा पाठिंबा घेत विद्यमान खासदार नवनीत राणा या निवडणूक लढणार आहेत. अशात रिपाइंचे राजेंद्र गवई यांना उमेवारी न मिळाल्यास, त्याचा फटका महाविकास आघाडीला पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.