RTO Officer taken Bribe
RTO Officer taken Bribe Sarkarnama
विदर्भ

RTO Officer News : वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केलेल्या शेजवळांच्या विरोधात लाच प्रकरणी गुन्हा दाखल !

सरकारनामा ब्यूरो

female motor vehicle inspector Taken Bribe : वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचा आरोप केल्याने चर्चेत आलेल्या परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक गीता भास्कर शेजवळ यांच्या विरोधात काल (ता. ५ मे) नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी कांद्री चेकपोस्टवर ट्रकचालकाकडून ४०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. (A case has been registered against the female motor vehicle inspector)

याप्रकरणी काल दुपारच्या सुमारास सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. त्यांनी शेजवळ यांच्यासाठी पैसे मागितल्याची कबुली दिली होती. मुकुंद सोनकुसरे, राजेश भातखोरे अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्री परिसरातील चेक पोस्टवर ट्रकची तपासणी केल्यावर ते सोडण्यासाठी प्रत्येक ट्रकचालकाकडून ४०० रुपयांची मागणी केली जाते, अशी तक्रार अमरावती विभागातील यवतमाळच्या लाचलुचपत विभागाकडे आली होती.

विशेष म्हणजे, ट्रक पासिंगसाठी चालकांकडून रक्कम उकळली जात असल्याची तक्रार लातूर जिल्ह्याच्या चाकोट तालुक्यातील रहिवासी असणारा ट्रकचालक विकास केदार (वय २४) याने गुरुवारी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दिली होती. त्याआधारे त्याच रात्री सापळा रचण्यात आला. योजनेनुसार लाचलुचपत विभागाकडून एका ट्रकचालकाला पाठविण्यात आले. शेजवळ यांनी तडजोडीअंती ४०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्याचे समजते. दरम्यान तिघेही तिथून पळून गेल्याने पथकाने रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शासकीय इमारतीत खासगी व्यक्तींना सुविधा..

मोटार वाहन निरीक्षक शेजवळ हिने ट्रकचालकांकडून ट्रक एन्ट्रीसाठी रक्कम स्वीकारण्यासाठी सोनकुसरे व भातखोरे यांची नियुक्ती केली होती. शासकीय इमारतीतील कक्षामध्ये त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. शेजवळ हिच्या ड्युटीच्या काळात हे दोघे ट्रकचालकाकडून रक्कम उकळत होते.

कुण्या चालकाने पैसे देण्यास नकार दिल्यास शेजवळ हिला बोलावून घेतले जात होते. एसीबीकडून पाठविण्यात आलेल्या चालकाकडे या दोघांनी रकमेची मागणी केली. पण, त्याने रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त केली. यामुळे शेजवळला बोलावून घेण्यात आले. तडजोडीअंती ट्रक पुढे नेण्यासाठी ४०० रुपये देण्याचे ठरले.

पती-पत्नी दोघेही लाचखोर..

गीता शेजवळ यांनी उस्मानाबाद (Osmanabad) येथे कार्यरत असताना पात्रता प्रमाणपत्रात घोटाळा केला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी (Police) गीता आणि शाळा व्यवस्थापनाविरुद्ध फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. विभागीय चौकशीत गीताही दोषी आढळल्याने तिची वेतनवाढही रोखण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर आणि बार्शी येथेही त्यांनी गैरप्रकार केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे बायोमेट्रिक वापरून त्या सुटीच्या दिवशी कामावर येऊन आपल्या कामांचा निपटारा करायच्या.

नुकत्याच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. गीता शेजवळ आणि तिचा पती अभिजित मांढरे हे दोघेही निरीक्षक असून कायम चर्चेत असतात. फेब्रुवारी महिन्यात मांढरे याची पोस्टिंग कांद्री चेक पोस्टवरच होती. त्यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५०० रुपयांची अवैध वसुली करताना ताब्यात घेतले होते. मांढरे आणि शेजवळ यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT