Rupali Chakankar and Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

रुपाली चाकणकर म्हणाल्या, शरद पवारांवरील अशा टीका विरोधकांनाही मान्य नाहीत…

एकदम खालच्या स्तरावर जाऊन जेव्हा शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली जाते, तेव्हा विकृती बाहेर येत असते. अशा विकृतीला वेळीच ठेचणे गरजेचे आहे, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आज येथे म्हणाल्या.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : ज्या व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्राला दिशा दिली आणि महाराष्ट्रावर तोक्ते वादळ, भूकंप, महापूर किंवा आत्ता आत्ताचा कोरोना असो. दोन पावलं पुढं जाऊन महाराष्ट्राच्या मदतीसाठी, महाराष्ट्र वाचला पाहिजे, यासाठी ज्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. अशा व्यक्तींबद्दल आदर व्यक्त होणं महत्वाचं आहे. पण असे असताना एकदम खालच्या स्तरावर जाऊन जेव्हा शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली जाते, तेव्हा विकृती बाहेर येत असते. अशा विकृतीला वेळीच ठेचणे गरजेचे आहे. त्यामुळे गृह विभागाने या विकृतीच्या विरोधात कारवाई करावी, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आज येथे म्हणाल्या.

सकाळ माध्यम समूहातर्फे हॉटेल सेंटर पॉईन्ट येथे विभागीय आयुक्त माधवी खोडे - चवरे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, नागपूरकर अभिनेत्री शिवांगी देवरस आणि ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’मध्ये आज महिलांच्या कर्तुत्वाचा सुगंध दरवळला. दिमाखात झालेल्या या सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांचा गौरव केल्यानंतर रुपाली चाकणकर बोलत होत्या.

केतकी चितळेचे नाव घेण्याचे टाळत चाकणकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. अशा काही प्रकरणांमध्ये राज्यभरातून राज्य महिला आयोगाकडे तक्रारी आलेल्या आहेत. अशा वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होते आणि शांत असणारा समाज अशांत करण्याचा प्रयत्न केला जातो. आज महाराष्ट्रासमोर इतर अनेक प्रश्‍न आहे, पण त्यावर न बोलता असे काही वादग्रस्त विधानं करून आपले काहीतरी अस्तित्व दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. ही विकृती आहे आणि या विकृतीच्या विरोधात कारवाई व्हावी, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

‘बारामतीच्या गांधीसाठी पुन्हा एक नथुराम गोडसे जन्माला यावा’, अशी एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्याचाही सौ. चाकणकर यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, या कृतीबद्दल महाराष्ट्रातून राग, संताप व्यक्त केला जातोय. समाजाच्या प्रत्येक घटकातून राग व्यक्त केला जात आहे. शरद पवारांबद्दल अशा प्रकारची टीका ही समाजाला मान्यच नाही आणि विरोधकांनाही अशी टीका मान्य नाही. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात आहे आणि अशा प्रकारच्या विकृतीला आळा घालण्यासाठी सायबर विभागाने असे अकाऊंट चालवणाऱ्यांवर कारवाई करावी आणि हुडकून अशा लोकांना जेरबंद करावे.

राणा दाम्पत्याने आधी ‘तो’ हिशेब द्यावा..

कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राचा प्रत्येक सैनिक जेव्हा लढत होता, तेव्हा केंद्राने काय मदत केली, याचा हिशेब आधी राणा दाम्पत्याने द्यावा. त्यांनी स्वतः महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी काय केले, हे सांगावे. ते स्वतः केंद्रात प्रतिनिधित्व करीत आहेत. आज कोरोनाच्या संकटातून देश आणि महाराष्ट्र बाहेर पडत असताना अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, बेरोजगारांचे अनेक प्रश्‍न आहेत. या प्रश्‍नांवरती त्यांनी बोलावं. पण ते तसे करत नाहीये. कारण कोणत्याही संकटात महाराष्ट्र एक येतो, संकटांशी लढतो, हे राणा दाम्पत्याला सहन होत नाहीये. हेसुद्धा विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

महाराष्ट्राच्या जनतेसाठी विरोधकांनी काम केले पाहिजे. कारण आत्ताची जी स्थिती आहे, त्यातून आधी सावरणे गरजेचे आहे. पण विरोधक काय करतात, तर महाराष्ट्राच्या पोलिसांना, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याच्या कामात व्यग्र आहेत. हाच एककलमी कार्यक्रम ते राबवत आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT