Yavatmal : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त देशभर कार्यक्रम साजरे केले जात आहेत. याच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त साधून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी आपल्या कन्येचे राजकीय क्षेत्रात ‘लॉचिंग’ केले. अनेक ठिकाणी दामिनी राठोड यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे पूजन करुन गोरगरीब आणि नागरिकांना प्रत्येकी एक किलो याप्रमाणे 30 क्विंटल म्हणजेच 3 हजार किलो साखरेचे वाटप केल्या गेले. राजकीय क्षेत्रातील राठोड यांच्या कन्येची ही ‘लॉचिंग’ थेट एका विधानसभा क्षेत्रात उमेदवारीसाठी असल्याचेही बोलले जात आहे.
पालकमंत्री संजय राठोड हे यवतमाळ-वाशिम लोकसभेचे दावेदार ठरु शकतात. अजातशत्रू असलेल्या राठोड यांचा बंजारा समाज या लोकसभा मतदारसंघात लक्षणीय आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी ते लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलल्या जात होते. शिवाय नेर-दारव्हा-दिग्रस या विधानसभा मतदारसंघात ते त्यांची कन्या दामिनी राठोड यांना उमेदवारी देणार असल्याचेही सांगितल्या जात होते. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात दामिनीला स्थान देण्यात आले. त्यानंतर आज श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त साधत पहिला कार्यक्रम घेण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अनेक ठिकाणी दामिनी राठोड यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवाय अनेक पदाधिकार्यांच्या उपस्थितीत यवतमाळ शहरातील विविध भागात गोरगरीब आणि नागरिकांनाही तब्बल तीन हजार किलो साखरेचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता पालकमंत्री राठोड यांनी कन्या दामिनी राठोड यांचे राजकीय क्षेत्रात ‘लॉचिंग’ केल्याचे बोलले जात आहे. ही ‘लॉचिंग’ आता एखाद्या विधानसभा क्षेत्रापर्यंत पोहोचते का हे येणारा काळच सांगेल.
यवतमाळ शहरात कन्येचे ‘लॉचिंग’ करताना पालकमंत्री राठोड यांचे समर्थक आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमांमध्ये कन्या दामिनी हिच्या सोबत पालकमंत्री संजय राठोड दिसले नाही. त्यामुळे त्यांना कन्या दामिनीबाबत प्रचंड आत्मविश्वास असल्याचेही बोललेल जात आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे मोठे राजकीय प्रस्थ आहे. नेर-दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघ तर त्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जातो. कधीकाळी हा दारव्हा मतदारसंघ होता. तेव्हा दिग्रस त्यामध्ये जोडल्या गेला नव्हता. या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे मातब्बर नेते माणिकराव ठाकरे यांचे प्राबल्य होते. शिवाय दिग्रस विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचे पदाधिकारी तथा माजी मंत्री संजय देशमुख यांचे प्राबल्य होते. मात्र दिग्रस, दारव्हा आणि नेर हे तीन तालुके दिग्रस मतदारसंघात पुर्नरचनेत विलीन झाले. त्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी ही विधानसभा काबीज केली. तेव्हापासून आजतागायत त्यांचेच तेथे प्राबल्य आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.