Bacchu Kadu and Sanjay Rathod Sarkarnama
विदर्भ

Sanjay Rathod : यांनी वाचलाच नाही अर्थसंकल्प, तर इंग्रजीतून मांडल्याने बच्चू कडू नाराज !

Bacchu Kadu : हिंदी बोलणाऱ्याकडून अर्थसंकल्प सादर करा. नाहीतर माफी मागून इंग्रजी बोला.

सरकारनामा ब्यूरो

Budget 2023 News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. पण राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी हा अर्थसंकल्प पाहिलाच नाही. पण तो शेतकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या हिताचा असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी अर्थसंकल्प इंग्रजीतून सादर केल्यावरून नाराजी व्यक्त केली.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना संजय राठोड (Sanjay Rathod) म्हणाले, ‘मी अजून अर्थ संकल्प पाहिलाच नाही आणि वाचला पण नाही. पण तो शेतकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या हिताचा असेल अशी मला खात्री आहे.’ तर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना विचारणा केली असता ते म्हणाले, अर्थसंकल्पाचे बरेच किस्से आहेत. मी राज्यमंत्री असताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोषणा केली होती की, प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अचलपूरला १० कोटी देणार, नरनाळा किल्ल्यासाठी २० कोटी देणार. पण नंतर ती घोषणा हवेतच विरली.

अजित दादांच्या घोषणेनंतर २ वर्ष झाले, मी पत्र देऊन देऊन थकलो. शेवटी त्यांना म्हणालो. दादा तुमच्या भाषणात तुम्ही म्हणाले होते आणि अर्थसंकल्पीय भाषण म्हणजे लोकांसाठी त्या सरकारचा आरसा असतो. तुम्ही तो निधी दिला पाहिजे. येवढे सांगूनही पुढे त्याचे काहीच झाले नाही, असा एक किस्सा बच्चू कडू यांनी सांगितला. अर्थसंकल्पाचं असंच असतं. भाषण लांबलचक असतं, पण कृतीमध्ये किती येतं, हे कळतच नाही, असे ते म्हणाले.

काही बाबी समाधानकारक, पण...

केंद्र सरकारच्या आज मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी समाधानकारक आहेत. अर्थसंकल्प चांगला आहे. पण यामध्ये कोट्यवधी शेतकरी, बेघर, मजूर सुटले आहेत. आरोग्य यंत्रणा सक्षम होईल, असे या यातून वाटत नाही. या सर्व गोष्टींचा विचार अर्थसंकल्पामध्ये व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडला गेला, ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. कुसुमाग्रज म्हणायचे, ‘भाषा मरत असली की देशही मरत असतो.’ आपल्या देशाची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. ज्या भाषा बोलणाऱ्यांनी तुम्हाला निवडून दिले, ती भाषा तुम्ही सभागृहात बोलले पाहिजे. जेणेकरून देशातील सामान्य माणसाला ती भाषा, तो अर्थसंकल्प समजला पाहिजे. म्हणून पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा हिंदीतून सादर झाला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

हिंदी बोलता येत नसेल तर...

भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी या देशाच्या संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. या देशाची भाषा इंग्रजी नाही आणि उद्या राज्याचा अर्थसंकल्प आम्ही हिंदीतून मांडला तर काय होईल, असा सवाल त्यांनी केला. संसदेत केलेल्या भाषणातील शब्द थेट जनतेला जाऊन भिडले पाहिजे. पण तसे झाले नाही. अर्थसंकल्प इंग्रजीतून सादर करण्यात आला.

हा राष्ट्रभाषेचा अपमान आहे. त्याची दुरुस्ती सरकारने केली पाहिजे. हिंदी भाषा बोलता येत नसेल, तर हिंदी बोलणाऱ्याकडून अर्थसंकल्प सादर करा. नाहीतर माफी मागून इंग्रजी बोला. कारण आम्ही राष्ट्रप्रेमी लोक आहोत. त्यामुळे लोकसभेमध्ये झालेल्या प्रकाराची सुधारणा झाली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT