यवतमाळ : वर्षभरापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले पूजा चव्हाण प्रकरण अद्याप संपलेले नाही, ती महाराष्ट्राची मुलगी असून तिच्या आत्म्याला न्याय मिळवून देईपर्यंत आपली न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे. तूर्तास, हा विषय राजकीयदृष्ट्य़ा संपला असला तरी तो माझ्यादृष्टीने संपलेला नाही, असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केले. त्या आज येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे (BJP) जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, (Sanjeevreddi Bodkurwar) विधान परिषद सदस्य अॅड. नीलय नाईक, सूरज गुप्ता, रेखा कोठेकर, आरती फुफाटे, राजू पडगीलवार, शंतनू शेटे आदींची उपस्थिती होती. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना वाघ म्हणाल्या की, ’पूजा चव्हाण प्रकरणाचे मुख्य कर्णधार माजी वनमंत्री संजय राठोड यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच ‘क्लिनचीट’ दिली आहे. एका तरुण मुलीचा मृत्यू होतो आणि साधी तक्रारही नोंदविली जात नाही. या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष न घेताच त्यांना सोडून देण्यात आले.
माध्यमांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनाच याबाबत जाब विचारला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ही लढाई केवळ पूजा चव्हाण हिची नसून महाराष्ट्रातील महिलांच्या अस्मितेची आहे. कोणी मंत्री असो वा नसो, आपली लढाई सुरूच राहणार आहे. म्हणूनच पूजा चव्हाण प्रकरणात न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर फारसे वक्तव्य करणे योग्य नाही. पूजा चव्हाण हिच्यासाठी लढणारी चित्रा वाघ हीच असून आता ही लढाई न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे. पूजा चव्हाण प्रकरणात खरा गुन्हेगार कोण आहे, असे विचारले असता या प्रकरणात संजय राठोड हेच खरे कर्णधार असल्याचा पुनरुच्चार चित्रा वाघ यांनी केला.
संजय राठोड हे शिंदे गटाचे मंत्री..
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे संयुक्त सरकार आहे. संजय राठोड हे शिंदे गटाचे मंत्री आहेत. पक्ष कार्यकर्ता म्हणून मी हा विषय राजकीयदृष्ट्या संपवला असला तरी तो माझ्यादृष्टीने सुरूच राहील, असे स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी यावेळी दिले.
पूजा चव्हाण माझी नातेवाईक नाही. ती महाराष्ट्राची मुलगी आहे. आपली लढाई ही महिलांच्या अस्मितेसाठी आहे. ही लढाई लढत असताना मला व माझ्या परिवाराला काय काय त्रास सहन करावा लागला याची जाणीव आहे.
- चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष, महिला आघाडी भाजप.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.