Wajahat Mirza and Satej Patil
Wajahat Mirza and Satej Patil Sarkarnama
विदर्भ

Satej Patil : पुरावे लोकप्रतिनिधींनी द्यायचे, मग अधिकारी काय करतात?

सरकारनामा ब्यूरो

RTO Pimpalkhuti Check Post News : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर तालुक्यातील पिंपळखुटी येथे राज्य परिवहन विभागाचे चेक पोस्ट आहेत. येथे अधिकाऱ्यांच्या दादागिरीचा मुद्दा आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी आज सभागृहात उपस्थित केला. यावरून सभागृहात वातावरण तापले होते.

अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना मारहाण केल्याची सीसीटीव्हीची क्लिप व्हायरल झाल्याचे डॉ. मिर्झा यांनी सभागृहात सांगितले. त्यावर ती क्लिप द्या, कारवाई करतो, असे मंत्री दादा भुसे यांनी म्हटले. त्यावर आमदार सतेज पाटील संतप्त झाले. लोकप्रतिनिधींनी पुरावे द्यायचे, मग अधिकारी काय करतात, असा सवाल करीत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही सतेज पाटील म्हणाले.

आरटीओचे अनेक नियम आहेत. गडचिरोलीचे अधिकारी नागपूर आणि भंडाऱ्याचा कारभार बघतात. त्यांना अतिरिक्त जिल्ह्याचा कार्यभार कसा काय देता, हे काय चाललंय आरटीओमध्ये? या प्रकाराची सखोल चौकशी करा, तुमच्याने होत नसेल, तर ॲंटी करप्शनला प्रकरण द्या. अधिकारी चौकशीला जातात आणि सर्व आलबेल आहे, असं सांगतात. त्यावर आपले सरकार समाधान मानते. पण विषयाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करीत नाही, असा आरोप सतेज पाटील यांनी केला.

घटनेचा व्हायरल व्हिडिओ लोकप्रतिनिधींना मागितला जातो. ज्या अधिकाऱ्याने चौकशी केली, त्याने या गोष्टी का पाहिल्या नाहीत? अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. चार चार कार्यभार एका अधिकाऱ्यावर आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे पाटील यांनी सभागृहाला सांगितले. यावर मंत्री दादा भुसे म्हणाले, आमदार डॉ. वजाहत मिर्झांच्या तक्रारीत ही माहिती नव्हती. आता तुम्ही सांगितले आहे, तर त्याचीही चौकशी केली जाईल.

पिंपळखुटीचा चेकपोस्ट आधीपासूनच वादग्रस्त आहे. येथे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कारवाया आणि आर्थिक उलाढाल होते. मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिले आहे. एक संवेदनशील सरकार आपण आहोत. योग्य कारवाई केली पाहिजे. पिंपळखुटीच्या लगतच्या गावांत विचारले तर लोक तेथील भानगडी सांगतील. तेलंगणा - महाराष्ट्राच्या सीमेवरील या चेकपोस्टवरील गैरप्रकारांचा बंदोबस्त सरकारने केला पाहिजे, असे आमदार रामदास आंबटकर यांनी सांगितले.

आमदार वजाहत मिर्झा यांनी जे मुद्दे सभागृहासमोर ठेवले, त्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली जाईल. एकाही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही, असे दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले. मोटर वाहन निरीक्षक (RTO) राहुल जाधव त्याची ड्युटी गेल्या वर्षी किती काळ या चेकपोस्टवर होती, याची माहिती घ्या, मग सर्व कळेल, असे सांगत किती दिवसांत चौकशी करणार, असा प्रश्‍न सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला. त्यावर सखोल चौकशी करून पुढच्या अधिवेशनाच्या आत कारवाई सह अहवाल दिला जाईल, असे दादा भुसे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT