Sadanand Nimkar, Aroli-Kodamendhi  Sarkarnama
विदर्भ

भाजपचे सुगीचे दिवस बघितले, प्रवेश घेतला अन् नेमका तोच भोवला...

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील (आबा) R. R. Patil त्यांचे निकटवर्तीय होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असताना त्यांनी चांगली पदे उपभोगली.

सरकारनामा ब्यूरो

संदीप गौरखेडे

कोदामेंढी (जि. नागपूर) : राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना महत्त्वाकांक्षा असतेच, त्यात काही गैर नाही. पण या पक्षातून त्या पक्षात माकडउड्या मारताना अचूक अभ्यास आणि अंदाज बांधावे लागतात. यामध्ये चूक झाली की, तुमचे राजकीय नुकसान झालेच म्हणून समजा.

नागपूर जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष ते प्रभारी अध्यक्षपद सांभाळणारे अरोली कोदामेंढी क्षेत्रातील सदानंद निमकर यांच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं. त्यांनी भाजपचे सुगीचे दिवस बघितले, पक्षात प्रवेश केला अन् नेमका तोच त्यांना भोवला.

निमकर यांचा राजकारणातला चांगला चाळीसएक वर्षाचा दांडगा अनुभव. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील (आबा) त्यांचे निकटवर्तीय होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असताना त्यांनी चांगली पदे उपभोगली. देशात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असल्याने आणि भाजपला आलेले सुगीचे दिवस त्याचप्रमाणे मोदी लाट मागील सात-आठ वर्षांत चांगलीच होती. ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करण्याची त्यांचीही इच्छा झाली.

राष्ट्रवादीमध्ये राहून काही सार्थक होणार नाही, हे त्यांच्या मनात आले आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो की विधानसभा वा लोकसभा यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असते. मागील म्हणजेच २०२० मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अरोली कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेसचे योगेश देशमुख यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनदेखील आले. सिनियर नेते सदानंद निमकर हे राष्ट्रवादीत असते तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमुळे या क्षेत्राची उमेदवारीचे दावेदार निमकर हेच असते. मात्र भाजपचे सुगीचे दिवस बघता सदानंद निमकर यांनी भाजप प्रवेश केला आणि तेथेच त्यांचा घात झाला.

मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अरोली कोदामेंढी क्षेत्रातून योगेश देशमुख ४०३२ मतांनी निवडून आले होते. भाजपचे अशोक हटवार यांचा त्यांनी पराभव केला होता. सेनेचे प्रशांत भुरे तिसऱ्या स्थानावर होते. आता पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार बदलवून सदानंद निमकर यांची वर्णी लावली. यात भाजपचे निमकर दुसऱ्या स्थानी राहतील किंवा निवडूनच येतील, अशीच पक्षाला आशा होती, मात्र झाले उलटेच. भाजपचे निमकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर सेनेचे प्रशांत भुरे हे दुसऱ्या स्थानी राहिले. काँग्रेसचे योगेश देशमुख २५३४ मतांनी विजयी झाले.

भाजपमधील काही नेते बंडखोरी करीत असल्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर पडले. त्यामुळे बावनकुळे यांनी या क्षेत्रात तळ ठोकला. नाराज कार्यकर्त्यांच्या बैठका लावल्या. त्यांची समजूत काढली आणि पक्षाच्या कामाला लावले. निमकर यांच्या प्रचारासाठी आमदार टेकचंद सावरकर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा झाल्या. पण त्याचे काहीएक सार्थक झाल्याचे आजच्या निकालात दिसले नाही. काँग्रेसचे योगेश देशमुख यांच्या प्रचार सभेकरिता हेवीवेट मंत्री सुनील केदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या सभांनी चांगलीच गर्दी खेचली होती. त्यांच्या सभा देशमुखांसाठी फायदेशीर ठरल्या. भाजप सरकारने महागाईचा कळस गाठला. त्यामुळे जनतेच्या मनातून भाजपविरोधातील राग खदखदत आहे, हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होते आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT