Buldhana News: महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेले ऑपरेशन टायगर सोमवारी (ता.23 जून) अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दणका देत यशस्वी करुन दाखवलं. याचदरम्यान, विदर्भातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित मोठी अपडेट समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे कट्टर समर्थक व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात सुरू आहे. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे शिंगणे हे गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वेटिंगवर असल्याची गोपनीय माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणेंबाबत हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात फारसे सक्रिय नसल्याची चर्चा आहे. त्यात ते तीन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शिंगणे समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे हे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामाविषयीची ही भेट असल्याचं कारण सांगण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी शिंगणे-फडणवीस भेट ठरण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेंद्र शिंगणे यांनी एका वृत्तवाहिनीशी भाजपप्रवेशाच्या चर्चांवर भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले,माझं जसं सुरू आहे, तसंच सुरु आहे. पण मंत्री आकाश फुंडकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी इच्छुक आहे. मला त्यांना बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या निमित्तानं काही पत्र देणे असल्याचं म्हटलं आहे.
राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.या मतदारसंघातून पाचवेळा ते आमदार राहिले आहेत. तसेच 2009 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय खेचून आणला. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंगणे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनोज कायंदे यांनी पराभव केला.
राजेंद्र शिंगणे यांच्याकडे कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. त्यांनी सरकारमध्ये यापूर्वी आरोग्य खाते, महसूल खात्याचे राज्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी क्रीडा आणि माहिती जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री पदही हाताळले आहे. 2004मध्ये आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे आरोग्य आणि अन्न व औषध प्रशासन खात्याची धुराही सोपवण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.