Sharad Pawar, Rohit Pawar Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar News : रोहित पवारांची संघर्ष यात्रा महाराष्ट्रात इतिहास घडवणार; शरद पवारांचे मोठे भाकित

Sharad Pawar On Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : हिवाळी अधिवेशनाने नागपुरातील वातावरण तापलेले असताना दुसरीकडे रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज समारोप झाला...

Sachin Fulpagare

Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप आज नागपुरात झाला. या निमित्ताने नागपूरच्या टेकडी रोड परिसरात जाहीर सभा झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे (ठाकरे गट ) नेते संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी रोहित पवारांसह युवा संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या सर्व तरुणांचे कौतुक करत मोठे भाकित वर्तवले.

अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम रोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला होता. 800 किलोमीटरचा प्रवास, 32 दिवसांचा कालावधी, 10 जिल्हे, 20 तालुके, 400 गावे, रोज कमीत कमी 25 किलोमीटरचा प्रवास आणि 2 लाखांहून अधिक सामान्य नागरिकांशी थेट संवाद, असे मोठे काम या संघर्ष यात्रेतून झाले, असे शरद पवार म्हणाले.

अशाच प्रकार देशात दोन नेत्यांनी अशा यात्रा काढल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसरे म्हणेज चंद्रशेखर जे पंतप्रधान झाले होते. यांच्याकडून प्रेरणा घेऊन हा यात्रेचा कार्यक्रम तरुणांनी आयोजित केला. यातून तरुणांचे प्रश्न मांडले, पदभरती, कंत्राटी नोकर भरती, रिक्त जागा भरण्यासंदर्भातील अनेक प्रश्न तरुणांसमोर आहेत. यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली. यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही संघर्ष यात्रेतून प्रयत्न करण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले.

अलिकडच्या काळात आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला. मराठा, धनगर, लिंगायत किंवा मुस्लिम आरक्षण असेल याबाबत आशावाद निर्माण करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे. पण ते पार पाडत नसतील तर या सरकारला जागे करण्यासाठी ही संघर्ष यात्रा निघाली, असे त्यांनी सांगितले. ही संघर्ष यात्रा महाराष्ट्राला आणि देशाला योग्य मार्गावर नेण्याचे काम करेल, असा अशावाद शरद पवार यांनी व्यक्त केला.

ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे. मी एकवेळा अशी यात्रा काढली होती. जळगावपासून ते नागपूरपर्यंत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढली होती. अनेक लोक त्या यात्रेत होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी नेतृत्व केले ते यशवंतराव चव्हाण या यात्रेत होते. आम्ही निघालो. पण आमरावती जिल्ह्यात चव्हाणसाहेबांना आणि आम्हाला अटक करण्यात आली, हा अनुभव शरद पवार यांनी यावेळी सांगितला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशा यात्रा या इतिहास घडवत असतात. त्यावेळी आम्ही काढलेली यात्रा कापसाला चांगली किंमत मिळवण्यासाठी होती. शेतमालाच्या किमतीसाठी होती. त्यावेळचे राज्यकर्ते याकडे लक्ष देत नव्हते. म्हणून आम्ही दींडी काढली होती. या दींडीचा परिणाम म्हणून नागपूरमध्ये हजारो शेतकरी जमले. सामुदायिक शक्तीमुळे यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावे लागले आणि हे प्रश्न सोडवावे लागले, असे त्यांनी सांगितले.

आज तरुणांनी हा कार्यक्रम हाती घेतला. त्यांनी यात्रेतू एक इशारा दिला आहे. या यात्रेत शेतकऱ्याचे हित आहे, तरुणांचे भवितव्य आहे आणि त्यासाठी तुम्ही सहकार्य करा आणि सामंजस्य दाखवा, असा इशारा सरकारला दिला गेला. पण सामंजस्य आणि सहकार्य दाखवत नसाल तर ही युवाशक्ती काय करू शकते, हा इतिहास या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असे पवार म्हणाले.

इतक्या दिवसांचा हा प्रवास आहे. पाय दुखतात, पायाला फोड कसे येतात या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्या आहेत. सहभागी झालेल्यांनी चेहऱ्यावरही कधी दुःख दाखवले नाही आणि जिद्दीने रोहितच्या नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रा पूर्ण केली. एक नवीन दिशा दाखवली. त्याबद्दल सर्वांचे अभिनंद करतो, असे म्हणत शरद पवारांनी रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT