Ravikant Tupkar and Sharad Pawar
Ravikant Tupkar and Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

शरद पवार म्हणाले, रविकांत तुपकरांशी माझे बोलणे झाले…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना काल रात्री १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास नागपूर पोलिसांनी अटक केली. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारणा केली असता, रविकांत तुपकरांशी माझे बोलणे झाले आहे. याचा निर्णय घेणाऱ्यांशी बोलावे लागेल, असे सकारात्मक उत्तर त्यांनी दिले.

सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी काल सकाळी ८ वाजता येथील संविधान चौकात अन्नत्याग आंदोलनाला बसलेले रविकांत तुपकर यांना काल रात्री नागपूर पोलिसांनी अटक करून बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात त्यांना बुलडाणा येथे नेण्यात आले. आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी त्यांना सोडले. तेथेही त्यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरूच ठेवला आहे.

काल सकाळी ८ वाजता रविकांत तुपकर यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर दुपारी शरद पवार नागपुरात दाखल झाले. पहिल्या सत्रातील कार्यक्रम आटोपून दुपारी ४ वाजता त्यांनी नागपूर जिल्ह्यातील उद्योजकांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी रविकांत तुपकरांचे आंदोलन आणि शेतकरी यांच्याविषयी विचारले असता, ते म्हणाले, यासंदर्भात रविकांत तुपकरांशी माझे बोलणे झालेले आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. पण या विषयावर काहीही बोलण्यापूर्वी निर्णय घेणाऱ्यांशी बोलावे लागेल. येथून परत जाताच राज्य सरकारमधील संबंधितांशी बोलल्यानंतर याबद्दल काही सांगणे योग्य होईल.

दरम्यान आज दिवसभरापासून तुपकरांच्या घरावर पोलिसांची करडी नजर आहे आणि चहूबाजूने पोलिसांनी पहारा लावलेला आहे. कितीही पहारा लावा, अशा कितीही कारवाया करा, तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही, अशी भूमिका तुपकरांनी ‘सरकारनामा’शी बोलताना स्पष्ट केली.

पोलिसांना सरकारच्या इशाऱ्यावर दडपशाही करून आम्हाला अटक केली आणि आज सकाळी बुलडाण्यात माझ्या घरी आणून सोडले. मी काल सांगितल्याप्रमाणे मी जेथे राहील, तेथे माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत कापूस, सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही, अशी प्रतिज्ञा मी घेतलेली आहे. आजपासून विदर्भ मराठवाड्यातील गावागावांमध्ये शेतकरी एकत्र येत आहेत, प्रभातफेऱ्या काढत आहेत. उद्या ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन होईल. परवा एक एक करून गावे बंद होणे सुरू होईल. आता या आंदोलनाचा भडका उडणार आहे, असे तुपकरांनी सांगितले.

सरकारला हे आंदोलन चिरडून सरकारला नेमकं काय साधायचं आहे. सरकारला सर्व राजकीय पक्षांची आंदोलनं चालतात. हजारोंचे मोर्चे चालतात. त्यांचे मंत्री, नेत्यांच्या इनडोअर पाच-पाच, सात-सात हजार लोकांचे मेळावे चालतात. प्रस्थापित नेत्यांच्या मेळाव्यांमुळे कोरोना होत नाही आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कोरोना होतो, असा जावईशोध सरकारने कुठून लावला, ठाऊक नाही. सरकारला जर वाटत असेल की, सोयाबीन-कापूस वाला शेतकरी संघटित नाही, तर ही सरकारची चूक आहे.

कापूस-सोयाबीनवाल्या शेतकऱ्यांची ताकत आता येथून पुढे सरकारला दिसून जाईल. सरकारने षड्यंत्र करून सोयाबीनचे भाव पाडले, कापसाचे भाव पाडले. हे षडयंत्र सरकारला फार महागात पडणार आहे. माझा जीव गेला तरी बेहत्तर पण आता माघार नाही. गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग दाखविला आहे, त्याच मार्गावर चालून आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढतो आहे. आता न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही, असा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT