Sharad Pawar, Nana Patole
Sharad Pawar, Nana Patole  sarkarnama
विदर्भ

राष्ट्रवादीचे दुकान बंद करणार, या पटोलेंच्या वक्तव्यावर पवारांचे `जशास तसे` उत्तर

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : एखादी व्यक्ती लोकसभा निवडणूक भाजपमधून लढते. भाजपकडूनच विधानसभा लढते. त्यामुळे त्या पक्षाची विचारधारा त्या व्यक्तीत असू शकते. त्यामुळे नाना पटोले यांनी भाजपच्या विचारधारेच्या मानसिकतेतून त्यांनी राष्ट्रवादीवर आरोप केला असेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विदर्भातील दुकान बंद झाल्यात जमा आहे. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात एकमेव दुकान उरले आहे. अन ते बंद व्हायला असा किती वेळ लागणार आहे, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डिवचले होते.

यावर आज पत्रकार परिषदेत विचारले असता पवार यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, काँग्रेस आणि आमची विचारधारा गांधी, नेहरुंची विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेसशी मिळतेजुळते विचार मांडतो. सत्तेत एकत्र असताना सहकारी पक्षांबद्दल काय आणि कसे बोलावे, याचे भान प्रत्येक पक्षातील सहकाऱ्यांनी ठेवायला पाहिजे. पटोले हे भाजपकडून खासदार झाले होते. त्यामुळे त्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर अजून असावा.

अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईबद्दल बोलताना पवार म्हणाले की राजकीय नेत्यांवर बेछूट आरोप करायचे आणि त्याला सामोरं जायचं नाही, याला काही अर्थ नाही. त्यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग आता सांगतात की, माझ्याकडे यापेक्षा जास्त काही पुरावे नाहीत आणि कळस म्हणजे ते परमबीर सिंग सध्या फरार आहेत. केवळ परमबीर यांच्या मूर्खपणामुळे देशमुखांना कोठडीत जावं लागलं. काहीही संबंध नसताना त्यांना कोठडीत जावं लागतं, हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांना याच्या अनेक वेदना होत असतील, असे पवार म्हणाले.

संयम बाळगणे आवश्यक

अमरावतीच्या दंगलीत रजा अकादमी आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या अहवालावर पवार म्हणाले, हे माझ्या वाचनात आले आहे. हा संवेदनशील प्रश्न असल्याने सत्यता तपासून बघितल्यानंतरच यावर भाष्य करणे योग्य होईल. त्रिपुरातील घटनेची महाराष्ट्रात प्रतिक्रिया देणे योग्य नाही. हा विषय अधिक चिघळू नये याकरिता प्रत्येकानेच संयम बाळगावा असा सल्लाही पवारांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT