Sharad Pawar and Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar News: सत्ता लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आहे, याचा पंतप्रधानांना विसर पडला असावा !

समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार पुढे येत नाही. सत्तेचा केवळ उपभोग घेणे सुरू आहे.

सरकारनामा ब्यूरो

Wardha News: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार यात्रेच्या समारोपासाठी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काल वर्धा येथे आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. केंद्र सरकारच्या धोरणांवर त्यांनी सडकून टिका केली. शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावर त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले.

देशात सध्या महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार पुढे येत नाही. सत्तेचा केवळ उपभोग घेणे सुरू आहे. आज देशातला दीन, दलित अडचणीत आहे असे सांगून सत्ता सर्वसामान्यांचे दुःख कमी करण्यासाठी आहे, याचा विसर पंतप्रधानांना पडला असावा, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार यात्रेचा समारोप वर्ध्यातील सर्कस मैदानावर काल झाला. त्यावेळी पवार बोलत होते. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पूर्वीप्रमाणे आत्महत्या वाढत आहेत. याची साधी दखलही सत्ताधारी घेत नाहीत. कृषिमंत्री असताना वर्ध्यातील शेतकरी आत्महत्यांनी व्यथित झाल्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना घेऊन आलो. येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर केवळ कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या होत असल्याचे पुढे आल्याने थेट कर्जमाफी जाहीर केली.

आता मात्र येथे होत असलेल्या आत्महत्यांकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही, असे पवार म्हणाले. कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, वर्धा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख, माजी मंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांनी पाडले कापसाचे दर..

कापूस विदर्भ, खानदेशातील महत्त्वाचे पीक आहे. याच्या जोरावर शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल होत असते. असे असतानाही शासन कापसाचे दर पाडण्याचे षड्यंत्र रचले आहे. आज कापसाचे दर पडले, उद्या सोयाबीनचे दर पडतील. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी (Farmers) काय करावे, असा प्रश्न करीत पवार यांनी सरकारला धारेवर धरले. देशात मोठ्या प्रमाणात फळ उत्पादक आहेत. त्यांची फळे बांगलादेशात जात होती. मात्र, आयात शुल्कामुळे त्यावर निर्बंध आले. मात्र, बांगलादेशाला फळे घेण्याचे सांगणे त्यांना जमत नाही, असा टोला पवारांनी (Sharad Pawar) लगावला.

सत्तेच्या दुरुपयोगाचा मी बळी : अनिल देशमुख

देशात सत्तेचा नुसता दुरुपयोग सुरू आहे. हे मी अनुभवातून सांगू शकतो. कुठलाही गुन्हा नसताना मला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. हे सर्व करताना माझ्यावर सतत पक्ष बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. हा दबाव वाढविण्यासाठी सरकारने (State Government) माझ्या जवळच्या १३० लोकांवर धाडी घातल्या, पण त्यात त्यांच्या हाती काहीच हाती आले नाही, असे अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT