Eknath Shinde News, Uddhav Thackeray News, Shivsena News
Eknath Shinde News, Uddhav Thackeray News, Shivsena News Sarkarnama
विदर्भ

एकनाथ शिंदेंच्या विरोधात आंदोलन करणारे शिवसैनिक पडले बुचकळ्यात !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : शिवसेना कुणाची, याचा निकाल अद्याप लागलेला नाही. सद्यःस्थितीत मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा गट, अशीच स्थिती आहे. परवा परवा पर्यंत शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात नारे, निदर्शने केली, मोर्चे काढले. पण काल धक्कादायक घडामोडींनंतर अचानक शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यामुळे आता जावे कोठे, या प्रश्‍नाचे उत्तर शोधताना शिवसैनिक बुचकळ्यात पडले आहेत.(Shivsena News)

राज्याचा मुख्यमंत्री शिवसैनिक झाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अवस्था‘कोणता झेंडा घेऊ हाती...’ अशी झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पायउतार व्हावे लागले म्हणून कडवट शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्याने परिस्थितीत एकदम बदल झाला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असे गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणालाच वाटले नव्हते. रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांचा अपवाद वगळता एकनाथ शिंदे यांचे विदर्भात समर्थक नाहीत. आजवर त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई (Mumbai) परिसरच होते. त्यामुळे विदर्भात त्यांचा गटही नव्हता. शिंदे यांनी बंडखोरी केल्याने नागपूरच्या शिवसैनिकांनी त्यांना गद्दार संबोधले विरोधात निदर्शने व आंदोलने केली. आम्ही उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक असल्याचा छातीठोक दावा केला. मात्र गुरुवारी सायंकाळी राज्यात नाट्‍यमय घडामोडी घडल्या. (Eknath Shinde News)

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी सकाळी तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवा, असे आव्हान बंडखोरांना दिले होते. योगायोगाने तसेच घडले. शिंदे यांनी शिवसेना सोडली नाही. त्यांना काढून टाकल्याचे शिवसेनेने अद्याप अधिकृत जाहीर केले नाही. शिवसेनेचे बहुतांश आमदार त्यांच्या सोबतच आहेत. त्यामुळे शिंदे शिवसेनेचे की दुसऱ्या गटाचे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या घडामोंडीमुळे कालपर्यंत शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करणारे, निषेध करणारे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आता बुचकळ्यात पडले आहेत.

बदलाच्या शंकेने पदाधिकारी धास्तावले..

नागपूरमध्ये शिवसैनिकांमध्ये गटबाजी आहे. संपर्क प्रमुख व दोन महानगर प्रमुखांमध्ये पटत नाही. आंदोलन करतानाही दोन्ही वेगवेगळेच आंदोलने होतात. आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करणे शिवसैनिकांना परवडणारे नाही. त्यामुळे सर्वांनी मौन बाळगणेच पसंत केले आहे. जवळच्याच माणसांनी दगाफटका केल्याने संघटनेत मोठे फेरबदल होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी धास्तावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT