Akola crime news: अकोला महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरसेवक सागर भारुका यांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अटक केली. हॉटेल मालकाकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सिव्हिल लाईन पोलिसांनी सागर भारुका यांच्याविरोधात खंडणीसह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. 3 ऑक्टोबरच्या रात्री अकोला बसस्थानक परिसरातील हॉटेल कृष्णा इम्पेरियल येथे जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर हॉटेल मालकाकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर हॉटेलमधील कर्मचारी शोएब अख्तर जमील अख्तर यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी भारुका यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, भारुका यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अटकेनंतर सागर भारुका यांनी पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्यात आले असून, अकोला महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे ही कारवाई झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रकरणाला आता राजकीय रंगही मिळाला आहे.
सागर भारुका आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता. त्या वादातूनही भारुका यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे सध्याच्या खंडणीच्या आरोपातील अटकेनंतर अकोला महापालिकेतील भाजप आणि शिंदे गटातील आधीपासून असलेला संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
एका बाजूला हॉटेल कर्मचाऱ्याने केलेले आरोप आणि त्यावर पोलिसांनी केलेली कारवाई आहे, तर दुसरीकडे ही कारवाई राजकीय दबावातून झाल्याचा भारुका यांचा दावा आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे अकोल्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.